आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Divya Marathi, Urban Planning

फुटपाथचा तोटा, रस्ता छोटा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - रस्त्याला खेटून उभी ठाकलेली दुकाने, मध्येच लागणार्‍या हातगाड्या, अस्ताव्यस्त पार्किंग आणि खुलेआम घेतली जाणारी चिरीमिरी या बाबींमुळे रस्त्यांलगतच्या फुटपाथचा श्वास कोंडला आहे.
विभागीय मुख्यालय असलेल्या अमरावतीत पायी चालणेच कठीण झाले आहे. दरम्यान, नागरिकांच्या हक्काची ही जागा ज्यांनी गिळंकृत केली, त्यांच्या तावडीतून ती त्वरेने सोडविली जावी, अशी मागणी पुढे येत आहे. पदपथ नागरिकांचे की दुकानदारांचे, असा प्रश्नही त्यानिमित्त विचारला जात आहे. माजी पालकमंत्री डॉ. सुनील देशमुख यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून शहराला चांगले रस्ते व पदपथ मिळाले. वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी हा खटाटोप केला होता. परंतु, यंत्रणेतील उणिवांमुळे शहरात पुन्हा वाहतुकीची कोंडी होत आहे.


सुमारे 175 कोटी रुपये खचरून शहरात दोन उड्डाणपूल, राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गांचे बांधकाम, तब्बल चौदा अंतर्गत रस्त्यांची डागडुजी, चौकांचे सुशोभीकरण असा तो प्रकल्प होता. मात्र, त्याद्वारे तयार करण्यात आलेल्या शेकडो किलोमीटर फुटपाथला अतिक्रमणाचा विळखा बसला आहे.


असे बळकावले फुटपाथ
सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय व डी-मार्ट नजीकचा फुटपाथ चहा-नास्तावाला आणि इतरांनी व्यापला आहे.
शिवटेकडीच्या पायथ्याशी मजीप्रा कार्यालयासमोरील फुटपाथवर ज्यूस कॉर्नरवाल्यांचा ताबा आहे. दुसर्‍या बाजूला जिल्हा परिषदेच्या विर्शामगृहासमोरील पदपथ भजेवाल्यांनी व्यापला आहे.


अख्खी जागाच गिळंकृत
बापट चौकातील स्थिती अत्यंत जीवघेणी आहे. हातगाड्यावाल्यांना अनेकदा हाकलून लावल्यानंतरही प्रश्न सुटत नाही. वस्तुत: पोलिस आणि महापालिका या दोन्ही यंत्रणांच्या अगदी डोळ्यांसमोर ही जागा आहे. त्यामुळे महत्प्रयासाने नगर वाचनालयासमोर पार्किंग झोन तयार करण्यात आले. सद्य:स्थितीत हे अख्खे पार्किंगच गिळंकृत केले गेले आहे.


फेरिवाल्यांना हॉकर्स झोन द्या
डाव्या पक्षांच्या दबावामुळे केंद्र शासनातर्फे नॅशनल हॉकर्स पॉलिसी तयार करण्यात आली आहे. अटल बिहारी वाजपेयींचे सरकार असताना ती अस्तित्वात आली. परंतु, अद्याप बर्‍याच महापालिकांमध्ये ती लागू करण्यात आली नाही. अमरावतीने पुढाकार घ्यावा व आम्हाला हक्काची जागा द्यावी. सुनील घटाळे, पदाधिकारी, हॉकर्स युनियन, अमरावती.


अतिक्रमण कारवाई सुरूच
केवळ पदपथच नाही, एकूणच अतिक्रमणाच्या विरोधात कारवाई सुरू आहे. प्रत्येक कारवाईच्या वेळी संबंधितांना दंडही आकारला जातो. परंतु, वारंवार तीच ती कृती करावी लागते, ही वस्तुस्थिती आहे. हॉकर्स झोनची तयारी सुरू आहे. त्यानंतर हा प्रश्न पुन्हा तोंड वर काढणार नाही. गंगाप्रसाद जयस्वाल, अतिक्रमणविरोधी पथकप्रमुख, अमरावती.