आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Farming, Pesticide, Divya Marathi, Crow

चिंचपूर गावाची सकाळ होते कावळ्यांच्या कावकावने

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मोताळा - दिवसेंदिवस मनुष्याने केलेली झाडांची कत्तल, पर्यावरणाचा र्‍हास व वाढलेले प्रदूषण, वाढलेले सिमेंटीकरण आणि जंगलाचे शहरात होणारे रूपांतर, शेतीमध्ये पिके घेत असताना वापरली जाणारी कीटकनाशके व रासायनिक खते यांचा बेसुमार वापर यांचा परिणाम प्राणी, पक्षी व जंगली प्राण्यांवर होताना दिसत आहे. त्यामुळे पक्ष्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे. परंतु, तालुक्यातील चिंचपूर हे गाव याला अपवाद आहे. या गावात शेकडोच्या संख्येने कावळे असून, सूर्याेदयापूर्वी सकाळी 4 च्या सुमारास कावळ्यांच्या काव-काव गावकर्‍यांना जागे करते.
जिल्ह्यातील सर्वात मोठय़ा नळगंगा नदीच्या काठावर चिंचपूर हे गाव वसले असून, उंच सखल भागावर गावात भरपूर झाडे आहेत. लागूनच पक्षांना पिण्यासाठी भरपूर पाणी व अन्न उपलब्ध असल्याने येथे असंख्य जातीचे पक्षी येतात. परंतु, सर्वाधिक संख्या कावळा या पक्ष्याची आहे. निसर्गाच्या असंतुलनामुळे पर्यावरणातील पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे.
त्यामुळे येणार्‍या पिढीला पक्षी केवळ पुस्तकातच पाहायला मिळतील, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हिंदू धर्मात कावळा पिंडीला शिवल्याशिवाय पिंडदान होत नाही व तासन्तास वाट पाहून कावळा पिंड शिवायला येत नसल्याचे दिसून येत आहे. परंतु, चिंचपूर गावात कावळे भरपूर प्रमाणात आहेत. चिंचपूर या गावाची लोकसंख्या जेमतेम 1500 एवढी आहे. धरणाच्या शेजारी हे गाव असूनही येथे पाण्यासाठी एकही कायमस्वरूपी योजना नाही. मात्र, या गावात कावळ्यांची रेलचेल नेहमीच असते. गावात मोठय़ा प्रमाणात झाडे असल्याने कावळे आरामात आपला निवारा तयार करून येथे राहत आहेत.
कावळ्यांशी नागरिकांचे भावनिक नाते
अकोट तालुक्यातील अडगाव येथे असेच असंख्य कावळे होते. त्यामुळे येथील नागरिक कावळ्यांच्या कावकावने त्रस्त झाले होते. तेव्हा गजानन महाराजांनी अडगाव येथील कावळे हलवून चिंचपूर येथे आणले होते, अशी आख्यायिका गजानन महाराज पुराणामध्ये आहे. परंतु, या गोष्टीला वैज्ञानिक आधार नाही. कावळ्याची चतुराई आणि शेतकर्‍यांना उपयोगी असलेल्या कावळ्यांशी येथील नागरिकांचे भावनिक असे नाते आहे. या गावाला अनेक पक्षीप्रेमीही भेट देतात.