आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावती - वडाळी येथील दारू दुकानासंदर्भातील एसडीओ प्रवीण ठाकरे यांचा अहवाल जिल्हाधिकारी राहुल महिवाल यांच्या दालनात पोहोचला असून, अभ्यासाअंती सोमवारी (दि. 3) त्यासंदर्भातील निर्णय घेता येईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.
प्रभुदास झांबानी यांच्या मालकीच्या देशी दारू दुकानाला वडाळी येथील नागरिकांचा प्रचंड विरोध आहे. त्यासाठी गेल्या महिनाभरापासून आंदोलन सुरू आहे. दरम्यान, नागरिकांची तीव्र भूमिका लक्षात घेता, प्रशासनाने 16 फेब्रुवारी रोजी मतदान आयोजित केले होते. परंतु, मतदार यादीतील घोळामुळे अनेक महिलांना मतदान करता आले नाही. ही बाब जिल्हाधिकार्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मतमोजणी व निकाल राखून ठेवला होता. त्यामुळे मतदानाच्या प्रक्रियेतून हे दारू दुकान बंद होते की नाही, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. दुसरीकडे नागरिकांचा विरोध कायमच आहे. दारू दुकानामुळे आमची कुटुंबव्यवस्था बिघडेल. त्या भागातील सामाजिक आरोग्य धोक्यात येईल.
शाळा-महाविद्यालये-मंदिरे व इतर प्रार्थनास्थळांचे पावित्र्य भंग होईल. त्यामुळे ते दारू दुकान हद्दपारच केले जावे, अशी येथील देशी दारू दुकान हटाव कृती समितीच्या महिलांची मागणी आहे. राज्य उत्पादन शुल्क, महापालिका व दारू दुकान हटाव महिला समितीच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून, त्यांची बयाणे नोंदवून अहवाल तयार करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्यांनी एसडीओ प्रवीण ठाकरे यांची एकसदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली होती. मुळात मतदान प्रक्रियेत झालेल्या गोंधळाची या समिती नियुक्तीला किनार होती. मात्र, समितीने राज्य उत्पादन शुल्क, महापालिका व दारू दुकान हटाव महिला समितीच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांशी चर्चा करून व त्यांची बयाणे नोंदवून सर्वंकष अहवाल तयार केला आहे. दुकानाशी संबंधित सर्व बाबींचा आढावा घेण्यात आलेला हा अहवाल जिल्हाधिकारी यांच्या स्वाधीन करण्यात आला आहे.
निवडणूकविषयक बैठकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी सध्या पुण्यात आहेत. ते शनिवारी सायंकाळी परत येतील. रविवार हा साप्ताहिक सुटीचा दिवस असल्यामुळे सोमवारी ते कार्यालयात असतील. बहुदा त्याच दिवशी अहवालाला अनुसरून त्यांचा निर्णय बाहेर पडण्याची शक्यता आहे. या बाबीला त्यांनी स्वत: दुजोरा दिला असून, सध्या अहवालाचा अभ्यास व्हावयाचा आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. सादर झालेल्या अहवालावर आता कोणता निर्णय होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
..तरीही विजय नागरिकांचाच
मतदानाच्या प्रक्रियेमध्ये केवळ महिलांना मतदानाचा अधिकार आहे. निम्म्यापेक्षा किमान एक जास्त मत दुकान बंद व्हावे, या बाजूने पडले, तर हे दुकान बंद होऊ शकते, अशी कायदेशीर तरतूद आहे. परंतु, एवढे मतदानच होऊ द्यायचे नाही, असा चंग दुकानदाराने बांधला असल्यामुळे बहुदा तसे होणार नाही. मात्र, तरीही कायदा व सुव्यवस्था बाधित होण्याच्या सबबीखाली जिल्हाधिकारी ते दुकान हद्दपार करू शकतात, असा अनुभव आहे. अलीकडच्या काळात वाशीम येथे असाच तिढा निर्माण झाला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी उदय राठोड यांनी याच तरतुदीच्या आधारे तेथील नागरिकांना न्याय दिला होता, हेही या ठिकाणी स्पष्ट करणे गरजेचे आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.