आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Lok Sabha Election, Divya Marathi

अमरावतीत दोन ठिकाणी 30 लाख रुपये पकडले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - निवडणुकीच्या अनुषंगाने शहर पोलिसांनी सुरू केलेली नाकाबंदी अतिशय प्रभावी ठरत असल्याचे बुधवारी झालेल्या तीन ठिकाणच्या कारवाईवरून पुढे आले आहे. दुपारी भातकुली नाक्यावर खोलापुरी गेट पोलिसांनी 28 लाख रुपये, तर गाडगेनगर पोलिसांनी अर्जुननगर सीलिंग पॉइंटवर 94 हजार रुपये पकडले. सायंकाळी पुन्हा एका कारमधून एक लाख रुपये पोलिसांनी जप्त केले आहे. पहिल्या दोन घटनांमधील रकमा व्यापार्‍यांच्या असल्याचे पुढे आले असून, पोलिस चौकशी करीत आहेत.
खोलापुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भातकुली नाक्यावर पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कारची (एमएच 27 एसी 7916) तपासणी केली. या वेळी कारच्या डिक्कीमध्ये तब्बल 28 लाख रुपयांची रोकड होती. कारमध्ये चालक अनिल रामभाऊ जवंजाळ (39 रा. थिलोरी) व कारमालक विलास रामभाऊ टोळे (48, रा. सत्यभामानगर, दर्यापूर) हे दोघे होते. ही रक्कम विलास टोळे यांची असून, त्यांनी बुधवारी दुपारीच शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या श्याम चौक शाखेतून ती काढली होती. टोळे यांच्या मालकीची दर्यापूर येथे टोळे पाटील इंडस्ट्रीज नामक जिनिंग फॅक्टरी आहे. सध्या फॅक्टरीमध्ये शेतकर्‍यांकडून कापूस खरेदी सुरू असून, त्याच्याच चुकारा करण्यासाठी ही रक्कम काढल्याचे टोळे यांनी खोलापुरी गेट पोलिसांना सांगितले. टोळे यांनी एकूण 30 लाख रुपये काढले होते. त्यांपैकी दोन लाख रुपये पारस येथील गजानन बापू दांदळे यांना दिले, तर उर्वरित रक्कम ते दर्यापूरला घेऊन निघाले होते. पोलिसांनी पकडलेल्या रकमेमध्ये पाचशेच्या 18 लाखांच्या नोटा, शंभराच्या 10 लाखांच्या नोटा आहेत. तूर्तास पोलिसांनी ही रक्कम ठाण्यात आणली आणि जवंजाळ व टोळे यांचा जबाब नोंदवला. रकमेबाबत आयकर विभागाला पोलिसांनी कळवले आहे; तसेच स्टेट बँकेच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून माहिती मागितली आहे.
अन्य घटनेत अर्जुननगर सीलिंग पॉइंटवर वाहनांची तपासणी सुरू असताना एका कारमध्ये 94 हजारांची रोकड पोलिसांना आढळली. शहराच्या दिशेने येणार्‍या या कारची (एमएच 31 डीके 8280) पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान झडती घेतली होती. या वेळी कारमध्ये चालक विजय शंकर पचारे (29 रा. नागपूर) तसेच शेख रफिक शेख गफ्फार (नई वस्ती, नागपूर) व अ. शब्बीर अ. जमीर (32 रा. इतवारी, नागपूर) हे तिघे होते. आपण व्यापारी असून, शहरात टरबूज खरेदीसाठी आल्याचे त्यांनी गाडगेनगर पोलिसांना सांगितले. या प्रकरणी पोलिस तपास करीत आहेत, असे गाडगेनगरचे ठाणेदार दीपक कुरुलकर यांनी सांगितले.
सायंकाळी पकडले एक लाख
नागपूर येथे राहणारे अमित किशोर बोबडे (26, रा. विद्यानंद टॉप, हिलटॉप, नागपूर) हे स्कोडा कारने (क्रमांक एमएच 06 एएन 9901) नागपूरवरून पुण्याला जात होते. या वेळी त्यांच्यासोबत प्रणव रत्नाकर पावशेकर (26, रा. पुणे) आणि सूरज नामदेव भलावे (26, रा. नागपूर) हे होते. अमितच्या कारमध्ये असलेल्या बॅगमध्ये एक लाखाची रोख होती. पोलिसांनी अर्जुननगर सीलिंग पॉइंटवर कारची तपासणी केली असता, ही रक्कम मिळून आली. गाडगेनगर पोलिसांनी कारमधील रक्कम व तिघांनाही ठाण्यात आणले होते. या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले.