आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Master Plan For Conserving Tigers

44 व्याघ्र प्रकल्पांतील वाघ संरक्षणाचा बृहद् आराखडा तयार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पाकिस्तानात दडून बसलेला अल कायदाचा म्होरक्या ओसामा बीन लादेनचा शोध घेण्यासाठी अमेरिकेने अशाच विमानांचा वापर केला होता. याच तंत्रज्ञानाचा आधार घेत देशी बनावटीचे टेहळणी विमान प्रायोगिक तत्त्वावर भारतीय संरक्षण दलाच्या संरक्षण संशोधन विकास संस्थेने (डीआरडीओ) तयार केले आहे. त्याचा वापर भव्य पसारा असलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या हवाई टेहळणीसाठी करण्यात येईल. त्याचा मास्टर प्लान तयार झाला आहे, अशी माहिती व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक डॉ. दिनेशकुमार त्यागी यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. देशभरातील 44 व्याघ्र प्रकल्पांमध्ये या विशेष विमानाने टेहळणी करण्याची योजना प्रस्तावित आहे.


सारिस्काच्या जंगलात प्रात्यक्षिक
राजस्थानातील सारिस्का अभयारण्यात या टेहळणी विमानाचे यशस्वी प्रात्यक्षिक संरक्षण दलाच्या तांत्रिक चमूने मागील महिन्यात सादर केले. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन समितीच्या नवी दिल्ली येथे 18 ते 20 फेब्रुवारी दरम्यान झालेल्या बैठकीत हे चित्रीकरण दाखवण्यात आले. एका विमानाकरिता पन्नास ते साठ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. त्याला अत्याधुनिक कॅमेरे लागले आहेत. त्याद्वारे वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपण्यास मदत होईल. शिवाय जंगलात फिरणारे शिकारी हुडकून काढता येतील. सहाशे ते सातशे मीटर उंचीवरून हे विमान उड्डाण करेल. नियंत्रण कक्षातील संगणकाच्या मदतीने विमानांची गती, उड्डाण आणि लँडिंगचे नियंत्रण करण्यात येणार आहे. या विमानाला लागलेल्या कॅमेर्‍यात कैद होणारे वन्यप्राणी, परिसर अगदी ठळकपणे नियंत्रण कक्षातील डिजिटल पडद्यावर दिसतो, असे त्यागी यांनी सांगितले.


मनुष्यविरहित विमानाची वैशिष्ट्ये
600 ते 700 मीटर उंचीवरून उड्डाण. नियंत्रण कक्षाच्या परिसरात दहा किलोमीटरपर्यंत टेहळणी, जंगलातील वन्यप्राण्यांचे चित्रीकरण आणि छायाचित्रण करण्याची सुविधा, सॅटेलाइटशी जोडणारी यंत्रणा विकसित, जंगलात फिरणार्‍या संशयित शिकारी हुडकण्याची सोय, अशी वैशिष्ट्ये आहेत.


मास्टर प्लानकरिता शंभर कोटींची गरज
वाघांच्या शिकारीवर नियंत्रण मिळवण्याकरिता मनुष्यविरहीत टेहळणी विमानांचा हा विशेष मास्टर प्लान अंमलात आणण्याचे वनविभागाचे प्रयत्न आहेत. मात्र, त्याकरिता पन्नास कोटींची आवश्यकता आहे. या विमानांच्या माध्यमातून जंगलात होणार्‍या प्रत्येक हालचालीवर वनविभागाची नजर राहील. त्यामुळे वनकर्मचारी कोण आणि जंगलात फिरणारे शिकारी कोण, याचा शोध घेणे सोईचे होईल.

एक ते दीड वर्षांचा कालावधी
देशभरातील 44 व्याघ्र प्रकल्पांमध्ये हवाई टेहळणीच्या मास्टर प्लानसाठी किमान आणखी दीड वर्षे लागतील. याकरिता डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (डीजीसीए) आणि केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वेगवेगळ्या परवानग्या आवश्यक आहेत. मात्र, यामुळे शिकार बंद होईल आणि वाघांचे अधिवास वाढतील. डॉ. दिनेशकुमार त्यागी, क्षेत्र संचालक, मेळघाट व्याघ्र प्रकल्प.