आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Nationalist Congress, Sanjay Khodke, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा ‘एकला चलो रे’ प्रवास; खोडके नाराजच

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - उमेदवारी देताना कार्यकर्त्यांचे मत घेतले नाही म्हणून राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी स्वपक्षाच्या उमेदवाराबद्दल आधीच नाराजी व्यक्त केली. त्यातच जिल्हा परिषदेतील सत्तेचा मुद्दा पुढे करत काँग्रेसनेही प्रचारातून अंग काढून घेतले आहे. या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रवादीच्या उमेदवार नवनीत राणा यांचा ‘एकला चलो रे’ प्रवास सुरू आहे.


राष्ट्रवादीकडे सक्षम उमेदवार नसल्याचे सांगत श्रेष्ठींनी युवा स्वाभिमानचे आमदार रवि राणा यांच्या सहचारिणी नवनीत राणा यांना उमेदवारी दिली. त्यामुळे या उमेदवारीस पक्षांतर्गत विरोधाची किनार आहे. संजय खोडके यांची तेव्हापासून नाराजी असून, आपण प्रचार करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नवनीत राणा यांच्या प्रचारकार्यात शहर व ग्रामीण भागात प्राबल्य असणारा राष्ट्रवादीचा मोठा गट अजूनही सहभागी झाला नाही.


दुसरीकडे मित्रपक्ष काँग्रेसही अंतर राखून आहे. उमेदवाराबद्दल आम्हाला काही घेणे-देणे नाही, परंतु राष्ट्रवादी केलेला दगा आधी निस्तरावा, त्यानंतरच त्यांच्या उमेदवाराबद्दल विचार करू, अशी भूमिका पक्षाचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी घेतली आहे. त्यांच्या या निर्णयाला जिल्हा परिषदेच्या सत्तेची किनार आहे. जिल्हा परिषदेची निवडणूक काँग्रेस-राष्ट्रवादीने संयुक्तपणे लढवली होती. विजयानंतर मात्र राष्ट्रवादीने भाजप, शिवसेना व बसपशी युती करून सत्ता स्थापन केली होती. ती सत्ता सोडा, नंतरच तुमच्या उमेदवाराचा विचार करू, असे देशमुख यांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीदरम्यान सुरू असलेले हे भांडण व संजय खोडके यांची भूमिका यामध्ये राणा भरडल्या जात आहेत. एकंदर हा चर्चेचा विषय बनला आहे. उमेदवार राष्ट्रवादीची, मात्र दोन्ही काँग्रेस प्रचारापासून दूर असल्याचे हे चित्र केव्हा पालटते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


मुंबईत गुरुवारी बैठक
संजय खोडके यांनी दर्शवलेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने गुरुवारी (दि. 13) मुंबईत बैठक बोलावली आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार्‍या या बैठकीला प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव, उमेदवार नवनीत राणा व खोडके उपस्थित राहतील, असे सांगितले जाते. अशी बैठक बोलावली जाईल, असे जाधव यांनी अमरावती दौर्‍यादरम्यान स्पष्ट केले होते.


आमची मानसिकता नाही
राष्ट्रवादीने जिल्हा परिषदेची सत्ता मिळवताना जे राजकारण केले, तो दगाच आहे. आमच्याशी आघाडी असताना त्यांनी भाजप-सेना, बसपची साथ घ्यावी, हे योग्य नाही. त्यांनी आधी राजीनामा द्यावा, अशी आमची भूमिका आहे. मात्र, पक्षश्रेष्ठी जसे निर्देश देतील, तसे वागू. बबलू देशमुख, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस.