आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Police Commissioner, Promotion, Divya Marathi

पोलिस आयुक्ताच्या पदोन्नतीचे संकेत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या राज्यभरातील आयपीएस अधिकार्‍यांमध्ये अमरावती परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक बिपीन बिहारी आणि शहराचे पोलिस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांचीही नावे आहेत. गृहविभागातील विश्वसनीय सूत्रांनी ही माहिती दिली असून, लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही अधिकार्‍यांना बढती मिळण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.


परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक असलेले बिपीन बिहारी 1987 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सप्टेंबर 2012 पासून ते अमरावती परिक्षेत्रात कार्यरत आहेत. सुमारे दोन वर्षांचा त्यांचा कार्यकाळ सप्टेंबरमध्ये पूर्ण होत आहे. इतकेच नव्हे तर आगामी काळात अतिरिक्त पोलिस महासंचालक पदावर बढती मिळणार्‍यांच्या यादीतही बिहारी यांचे नाव आहे. अमरावती परिक्षेत्रातील त्यांची कारकीर्द प्रभावी ठरली आहे.


शहराचे पोलिस आयुक्त डॉ. सुरेश मेकला हे बढतीच्या यादीत नाव असलेले दुसरे अधिकारी आहेत. 1997 बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले डॉ. मेकला महाराष्ट्र पोलिस सेवेत सहायक पोलिस अधीक्षक पदावर ठाण्यात रुजू झालेत. अतिरिक्त पोलिस अधीक्षक, ..पोलिस अधीक्षक पदावर काम केल्यानंतर त्यांना पोलिस उपमहानिरीक्षक पदावर बढती मिळाली. पोलिस उपमहानिरीक्षक पदाच्या समकक्ष असलेल्या अतिरिक्त पोलिस आयुक्त पदावरही त्यांनी काम केले. अलीकडेच त्यांना अमरावतीच्या पोलिस आयुक्तपदी नियुक्ती मिळाली. परंतु, डॉ. मेकला यांची पुढची बढती पोलिस महानिरीक्षक, विशेष पोलिस महानिरीक्षक पदावर होणार आहे. त्यामुळे अमरावतीमध्ये त्यांची पोलिस आयुक्त म्हणून कारकीर्द फार काळ नसेल, असे गृहविभागाने स्पष्ट केले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर पोलिस अधिकार्‍यांच्या पदोन्नतीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यातच बिहारी आणि डॉ. मेकला या दोन्ही अधिकार्‍यांचीही नावे आहेत. बिहारी यांचा परिक्षेत्रीय महानिरीक्षक म्हणून दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांचा नव्या ठिकाणी पदोन्नतीवर नियुक्तीचा मार्ग जवळपास मोकळा आहे. मात्र, लोकसभा निवडणूक संपत नाही तोच डिसेंबर 2014 अखेरपर्यंत विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार असल्याने डॉ. मेकला यांना लगेच पदोन्नतीवर बदली मिळेल की विधानसभा निवडणूक आटोपल्यानंतर, याबाबत स्पष्ट होऊ शकले नाही.
पोलिस महासंचालनालय म्हणते : बदली आणि बढतीच्या मुद्दय़ाबाबत पोलिस महासंचालक कार्यालयाने स्पष्ट केले, की बिहारी यांचा कार्यकाळ पूर्ण होत आल्याने त्यांच्या बढती, बदलीबाबत अडचण निर्माण होईल, असे वाटत नाही. तर शासनाला वाटल्यास डॉ. मेकलांची आचारसंहिता संपल्यावर बढतीवर बदली होऊ शकते अथवा डॉ. मेकला यांच्या लगेच बदलीने पोलिसिंगमध्ये व्यत्यय येणार असेल, तर तांत्रिकदृष्ट्या अमरावतीचे पोलिस आयुक्तपद आयजी र्शेणीत तात्पुरते अपग्रेड करून डॉ. मेकला यांना आहे त्याच आयुक्तालयात कार्यरतही ठेवता येऊ शकते. असे तांत्रिक निर्णय यापूर्वी अनेकदा झाले आहेत. पण, ते शासनावर अवलंबून आहे.