आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Quarrel Among AAP Members

‘आप’च्या उमेदवारीमुळे उठलेय पक्षांतर्गत वादळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - राष्ट्रवादी काँग्रेसने घोषित केलेल्या उमेदवाराबाबत पक्षांतर्गत विरोध धुमसत असतानाच अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पार्टीच्या (आप) उमेदवारालाही अंतर्गत विरोध असल्याचे स्पष्ट झाले आहे.‘आप’च्या कार्यकर्त्या आशा अभ्यंकर यांनी शुक्रवारी दुपारी एका पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली. पक्षातर्फे अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी घोषित उमेदवार भावना वासनिक यांच्या विरोधात आपण निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी पक्षाचे बहुतांश पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. अभ्यंकर म्हणाल्या, उमेदवारीसाठी पक्षाने ऑनलाइन अर्ज मागवले होते. त्यामुळे कोण केव्हा अर्ज करतो, हे दुसर्‍याला माहीत होणे शक्य नव्हते. आपण उमेदवारी मागितली नाही, हे चक्क वासनिक यांनीच स्पष्ट केले होते. परंतु, अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दोन दिवसांत काय चमत्कार झाला कोण जाणे, त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि पक्षाने त्यांना उमेदवारीही दिली. ‘आप’ हा पक्ष प्रामाणिक लोकांचा पक्ष आहे. त्यामुळे स्वपक्षाच्याच पदाधिकारी-कार्यकर्त्यांसोबत खोटा व्यवहार करणार्‍या वासनिक यांना का म्हणून खपवून घ्यावे, असा अभ्यंकर यांचा सवाल आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी निवडणूक लढण्याचा पक्का इरादा केला असून, आगामी लोकसभा निवडणूक अपक्ष लढवावी की कशी, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


पत्रकार परिषदेला माधव कारेगावकर, अँड. नितीन उजगावकर, संगीता वाघ, रमेश मोहोड, विनोद गुलदेवकर, संजय तायडे, अशोक नंदागवळी, भगवान जाजू, सय्यद रियाजोद्दीन, सलूबर फिरदोस, नज्जूभाई, इम्रान खान, डी. एस. काळे, रवींद्र इंगळे, नितीन हिरुळकर, विराज मामर्डे, सोनाली हिरुळकर, के. एन. देशमुख, नईम खान आदी उपस्थित होते.


राष्ट्रवादीची रणनीती ठरणार आज
लोकसभेचे निरीक्षक मंत्री अनिल देशमुख आमदार प्रकाश डहाके यांच्यासमोरही भूमिका स्पष्ट केली. पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके व माजी आमदार सुलभा खोडके शनिवारी (दि. 1) अमरावतीत पोहोचत आहेत. ते आल्यानंतर पक्षाच्या बैठकीतच सर्वसंमतीने निर्णय होईल. अँड. किशोर शेळके, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी.


खोटे बोलणारा उमेदवार!
मी स्वत: भावना वासनिक यांच्याशी बोललो होतो. उमेदवारी मागितली नसल्याचे त्या म्हणाल्या होत्या. घोषणेने मलाही धक्का बसला. खोटे बोलणार्‍या आपची उमेदवारी कशी? माधव कारेगावकर, आप कार्यकर्ते.