आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Ravi Rana,MLA, Shiv Sena, Divya Marathi

जागा टिकवण्याचे शिवसेनेपुढे आव्हान, आमदार रवी राणांची प्रतिष्ठाही पणाला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - खासदार आनंदराव अडसूळ यांना शिवसेनेने पुन्हा दिलेली उमेदवारी, आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांना राष्‍ट्रवादीने दिलेले तिकीट आणि आघाडीने डावलल्यामुळे अपक्ष लढण्याच्या तयारीत असलेले रिपाइं नेते डॉ. राजेंद्र गवई यांच्यामुळे अमरावती लोकसभेची निवडणूक तिरंगी होण्याची चिन्हे आहेत. त्यातच नागपूरचे बांधकाम व्यवसायी गुणवंत देवपारे यांनीही अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेतली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश महासचिव संजय खोडके यांचा विरोध डावलून खोडके यांच्या मतदारसंघातील कट्टर विरोधक आमदार रवी राणा यांच्या पत्नी नवनीत कौर राणा यांनाच राष्ट्रवादीने उमेदवारी बहाल केली. त्यामुळे खोडके संतप्त झाले आहेत. दुसरीकडे, आघाडीत हा मतदारसंघ रिपाइंला (गवई गट) सोडावा, अशी मागणी डॉ. राजेंद्र गवई यांनी केली होती. मात्र, राष्‍ट्रवादीने ती धुडकावून लावली. त्यामुळे आता महायुतीसह खोडके व डॉ. गवई या दोन दिग्गजांच्या विरोधांचा सामना नवनीत राणा यांना करावा लागणार आहे.


आनंदराव अडसूळ
आनंदराव अडसूळ खासदार झाल्यानंतर शिवसेनेच्या गटांमध्ये धुसफूस आहे. अडसूळ यांच्या अमरावती एंट्रीनंतर काही प्रमुख पदाधिका-यांचे झालेले एक्झिट अडसूळ यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. 1999 पासून हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. यंदा माजी शहरप्रमुख दिनेश बूब यांनी अडसूळ यांच्याविरोधात उघडपणे भूमिका घेतली. त्याच वेळी संसदेतील उत्कृष्ट संसदपटू आणि अभ्यासू खासदार म्हणून अडसूळ यांनी मिळवलेला नावलौकिक त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार असल्याची चिन्हे आहेत.


नवनीत राणा
राष्ट्रवादी काँग्रेसने तिकीट दिलेल्या नवनीत कौर राणा यांना राजकारणाचा मुळीच अनुभव नाही. दाक्षिणात्य चित्रपटातील एकेकाळच्या अभिनेत्री आणि आमदार रवी राणा यांच्या पत्नी एवढीच त्यांची ओळख आहे. मात्र, राजकारणाचा कोणताही अनुभव पाठीशी नसताना रवी राणा यांनी 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तत्कालीन आमदार सुलभा खोडके यांचा तब्बल वीस हजार मतांनी केलेला पराभव हीसुद्धा नवनीत राणांकरिता जमेची बाजू आहे. जुन्या कार्यकर्त्यांना डावलल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजी आहे.


डॉ. राजेंद्र गवई
रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने रिपाइंला हा मतदारसंघ सोडला नाही, त्यामुळे गवई मित्रपक्षावर नाराज आहेत. 1996 च्या निवडणुकीत काँग्रेसने दादासाहेब गवई यांना अमरावतीची जागा सोडली नव्हती. काँग्रेसने उ. मो. भेले यांना ‘पंजा’ चिन्हावर उतरवले होते. त्या वेळीही रा. सु. गवई यांना एक लाख 52 हजार मते पडली होती. त्यामुळे अमरावतीत रिपब्लिकन मतदारांची गठ्ठा मते आहेत, हे तेव्हापासून सिद्ध झाले आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीला त्याचा फटका बसू शकतो.


राखीव मतदारसंघात काँग्रेसचे वर्चस्व
अमरावती मतदारसंघ अनुसूचित जातीकरिता राखीव आहे. या मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. यात अमरावती (रावसाहेब शेखावत, काँग्रेस), बडनेरा (रवी राणा, युवा स्वाभिमान), दर्यापूर (अभिजित अडसूळ, शिवसेना), अचलपूर (बच्चू कडू, प्रहार), मेळघाट (केवलराम काळे, काँग्रेस) आणि तिवसा (यशोमती ठाकूर, काँग्रेस) मतदारसंघांचा समावेश आहे. या सहाही मतदारसंघांत काँग्रेसचे तीन, अपक्ष दोन आणि शिवसेनेचा एक आमदार आहे.


गुणवंत देवपारे
नव्यानेच लोकसभा निवडणूक रिंगणात असलेले गुणवंत देवपारे यांना अमरावतीच्या राजकारणाचा काहीच अनुभव नाही. नागपूरचे बांधकाम व्यावसायिक एवढीच त्यांची ओळख आहे. मात्र, दोन वर्षांत समाजकारणाच्या माध्यमातून त्यांनी लोकांमध्ये मिसळण्याचा प्रयत्न केला. आता त्यांना कितपत यश मिळते याबद्दल साशंकता आहे.