आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati News In Marathi, Sport Minister Sanctioned District Stadium

सायन्सकोरवर जिल्हा स्टेडियम, क्रिडा मंत्र्यांचे स्पष्‍टीकरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - सायन्सकोरवर मॉल उभारण्याची चर्चा क्रीडाविश्वात चर्चिली गेल्यानंतर क्रीडा क्षेत्रात नाराजीचा सूर होता. या मैदानाला ऐतिहासिक वारसा लाभल्याने तसेच शहरातील खेळाडूंच्या सरावासाठी उपयुक्त असल्याने खेळाडूंसाठी स्टेडियम असावे, अशी मागणी जोर धरत आहे. या प्रश्नी ‘दिव्य मराठी’ने दस्तुरखुद्द क्रीडा मंत्र्यांचीच भूमिका जाणून घेतली.


अमरावती हे ‘स्पोर्ट्स हब’ म्हणून नावारूपाला येत असल्याने येथे स्टेडियम उभारणीस हरकत नसल्याचे क्रीडा मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. असे झाल्यास शहरात आंतरराष्ट्रीय खेळाडू घडू शकतील.
मुंबई, नाशिक, पुण्याचा आदर्श: मुंबई, नाशिक आणि पुणे हे तिन्ही जिल्हे क्रीडा क्षेत्रात आघाडीवर आहेत. येथे विभागीय क्रीडा संकुलांसोबतच जिल्हा क्रीडा संकुलही आहेत. विभागीय क्रीडा संकुलात नसणार्‍या सोयींची पूर्तता जिल्हा क्रीडा संकुलाच्या माध्यमातून झाल्याने या तिन्ही जिल्ह्यांमध्ये क्रीडा क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. याचा आदर्श अमरावती जिल्हादेखील घेऊ शकतो.


शासनाकडून आठ कोटी : शासनाच्या क्रीडा धोरणानुसार, जिल्हा स्टेडियमसाठी आठ कोटींचे अनुदान मिळू शकते. शासकीय अध्यादेशात अशा प्रकारचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला असून, यासाठी आता जिल्हा परिषद तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या पुढाकाराची गरज आहे. जिल्हा परिषदेने हे मैदान भाडेकरारावर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दिले, तर अमरावतीकरांना मोलाची देणगी मिळू शकते.


आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण
जिल्हा स्टेडियम उभे राहिल्यास शहरातील खेळाडूंना हॉकी, फुटबॉल आणि जलतरण या तिन्ही खेळांचे तज्ज्ञ प्रशिक्षकांमार्फत आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळेल. सोबतच आजवर शहरात ज्या क्रीडा सोयींचा अभाव होता, त्याचीही पूर्ती होईल. खेळाडूंना पुणे किंवा मुंबईसारख्या शहरांकडे धाव घेण्याची गरज भासणार नाही.

* क्रीडावैभव साकारण्यास सर्व बाजू अनुकूल

जागा दिल्यास प्रस्तावाला गती
जिल्हा स्टेडियम उभारण्यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा क्रीडा संकुल समितीला समन्वय करारावर जागा देण्याची तयारी दर्शवली, तर आम्ही प्रस्तावाला गती देण्यास तयार आहोत. यामुळे क्रीडांगण बचाव अभियानाची फलर्शुती होईल. अविनाश पुंड, जिल्हा क्रीडा अधिकारी.

गंभीरपणे विचार करू
सायन्सकोरला खेळांचे मैदान म्हणूनच कायम ठेवायचे आहे. त्यामुळे जिल्हा स्टेडियम उभारण्याच्या योजनेबाबत गंभीरपणे विचार करता येईल. यामुळे मैदानाचा विकास शक्य आहे. आम्ही मैदानाच्या सुरक्षेबाबत कटिबद्ध आहोत. लवकरच त्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलली जातील. सुरेखा ठाकरे, अध्यक्ष, जिल्हा परिषद.

‘स्पेशल केस’ म्हणून मुख्यमंत्र्यांपुढे ठेवू
सायन्सकोरवर जिल्हा स्टेडियमचा प्रस्ताव क्रीडा मंत्रालयापर्यंत आला, तर ‘स्पेशल केस’ म्हणून त्याला अनुदान मंजुर करू. क्रीडा हब असल्याने मुख्यमंत्रीही याला तत्काळ मंजुरी देतील. खेळांना प्रोत्साहन देण्याचा सरकारचे धोरण आहे. पद्माकर वळवी, क्रीडा मंत्री.


असे असू शकते स्टेडियम
मोर्शी मार्गावरील विभागीय क्रीडा संकुलात इनडोअर आणि अँथलेटिक्स स्टेडियम आहे. मात्र, यावर नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदान, अँस्ट्रो टर्फ असलेले हॉकी मैदान, आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव नाही. ही उणीव सायन्सकोर मैदानावर भरून निघू शकते. येथे आधीपासूनच फुटबॉल मैदान असून, जिल्हा स्टेडियम बनल्यास ते विकसित करता येईल. रुक्मिणीनगरच्या बाजूने जलतरण तलाव आणि बसस्थानकाच्या बाजूने हॉकी स्टेडियम साकारले जाऊ शकते. यानंतरही मैदानाचा बराचसा भाग शिल्लक राहतो. या ठिकाणी काही सार्वजनिक वा धार्मिक कार्यक्रम शक्य आहेत. आवश्यकता भासल्यास ती लोकपयोगी कामासाठी वापरता येईल.