आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विलंब शुल्कामुळे विद्या‍र्थ्‍यांमध्‍ये झाला संतापाचा उद्रेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - महाविद्यालयाच्या नियमित वेळेत हजर होण्यास पाच मिनिटांचा विलंब झाला, तर 50 रुपये आणि प्रॅक्टिकलला गैरहजर राहिल्यास किंवा विलंब झाल्यास 100 रुपये दंड, असा नवा नियम बडनेराच्या प्रा. राम मेघे महाविद्यालयाने अंमलात आणला आहे. या निर्णयाच्या विरोधात सुमारे साडेपाचशे विद्यार्थ्यांनी सोमवारी सामूहिक एल्गार केला. शिष्यवृत्तीची रक्कम न मिळाल्याची जोडही विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला देण्यात आली आहे.


शहरापासून सुमारे 16 किलोमीटरवरील या महाविद्यालयात विद्यार्थ्यांना राष्‍ट्रीय महामार्ग क्रमांक सहाने पोहोचावे लागते. त्यामुळे बरेचदा विलंब होतो. परंतु, विलंबाने येणे हा शिस्तभंग असल्याचे नमूद करत महाविद्यालयने दंड आकारण्यास प्रारंभ केला. संतप्त विद्यार्थ्यांनी या विरोधात सोमवारी एकही तासिका होऊ दिली नाही. नारेबाजी करत त्यांनी महाविद्यालयाचे कामकाज बंद पाडले. अचानक झालेल्या या आंदोलनामुळे महाविद्यालय प्रशासनदेखील हादरले. खास बाब म्हणजे, सोमवारी काही प्राध्यापकच विलंबाने आलेत. त्यानंतर विद्यार्थ्यांनी हे आंदोलन सुरू केले. शिस्तभंगाचा कायम शिरस्ता असलेल्या विद्यार्थ्यांना दंड जरूर आकारावा, पण अपरिहार्य कारणांमुळे एखाद्या विद्यार्थ्याला एखादवेळी विलंब झाल्यास त्याला दमदाटी करण्यात येऊ नये, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली.


मंगळवारीही आंदोलन
महाविद्यालाय प्रशासन आणि विद्यार्थ्यांमध्ये वादाच्या मुद्यावर तोडगा न निघाल्याने मंगळवारी देखील संप कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान कॉलेजने दंड आकारणीबाबत विद्यार्थ्यांना नोटीसही बजावल्या आहेत.


तोडगा काढलाय
विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती आणि दंडाबाबत काही मुद्दे होते. त्यासाठी ते चर्चेला आले होते. हा लहानसा मुद्दा आहे. आम्ही त्यावर यशस्वी तोडगा काढला आहे.
डॉ. डी. टी. इंगोले, प्राचार्य, प्रा. राम मेघे कॉलेज.

कंत्राटदार काळ्या यादीत
समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक आयुक्तांनी दिलेल्या लिखित आश्वासनानंतर निंभोरा येथील वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी शनिवारी (दि. 22) रात्रीपासून चालवलेले अन्नत्याग आंदोलन सोमवारी मागे घेतले. मेस कंत्राटदार बदलण्याची विद्यार्थ्यांची मागणी मान्य करण्यात आली असून, त्याला काळ्या यादीत टाकले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या इतर मागण्यांचीही पूर्तता करण्यात येईल.


भोजनाच्या तक्रारीवरून समाजकल्याण विभागाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन वसतिगृहातील विंग क्रमांक एकमधील शेकडो विद्यार्थ्यांनी शनिवारी रात्रीपासून अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली होती. आंदोलनाच्या तिस-या दिवशी युवा सेनेचे राहुल माटोडे, ललित झंझाड यांच्यासह अन्य कार्यकर्ते वसतिगृहात पोहोचले. त्यानंतर दुपारी दोनच्या सुमारास समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त पी. बी. नाईक तेथे पोहोचले. चर्चेनंतर त्यांनी मेस कंत्राटदार संजय महाजन यांचे कंत्राट रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याला काळ्या यादीत टाकून तत्काळ पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देशही दिले. नवीन कंत्राटदार देण्याचे मान्य करण्यात आले. पी. बी. नाईक यांनी स्टायपेंड, स्वच्छता, विजेचे दिवे आदी विविध समस्या जाणून घेतल्या आणि त्यावर लवकरच तोडगा काढला जाणार असल्याचे स्पष्ट केले.


स्वच्छतागृहात आढळली घाण, वॉटर फ्रिजर आहे बंद
विद्यार्थी विपरीत परिस्थितीत राहत असल्याच्या तक्रारीनंतर प्रादेशिक उपायुक्त नाईक यांनी विंग क्रमांक एकची पाहणी केली. वॉटर फ्रिजर अनेक दिवसांपासून बंद असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. स्वच्छतागृहात अत्यंत घाण आढळली. यावर त्यांनी नाराजी व्यक्त करत वसतिगृह प्रशासनास त्वरित साफसफाई आणि स्वच्छतेचे आदेश देऊन यंत्रणेस कामी लावले.विद्यार्थ्यांना कोणत्याही असुविधेचा त्रास होणार नाही, याचे आश्वासन त्यांनी विद्यार्थ्यांना दिले.


मेसचे कंत्राट रद्द
विद्यार्थ्यांच्या तक्रारी असल्याने भोजनाचे कंत्राट रद्द करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना असुविधा होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था करण्यात आली. 15 दिवसांत नवीन कंत्राटदार नेमला जाणार आहे. स्टायपेंडसह अन्य प्रश्न निकाली काढले जातील.
पी. बी. नाईक, प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, अमरावती.