आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चार गावांत पेटली नाही एकही चूल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धामणगावरेल्वे - सरपंच परिषदेसाठी जळगाव येथे काही जणांना घेऊन निघालेली स्कॉर्पिओ कार शनिवारी पहाटे साडेतीन वाजता मेहकर-चिखली मार्गावर झाडाला धडकली. या अपघातात धामणगाव तालुक्यातील तीन सरपंच व एका बँक कर्मचार्‍याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. यामुळे शोकमग्न जुना धामणगाव, वाठोडा, ढाकूलगाव व गुंजी या गावांमध्ये शनिवारी चुली पेटल्या नाहीत.


मृतांमध्ये जुना धामणगाव येथील सरपंच प्रवीण देविदास गुल्हाने (42) यांचा समावेश आहे. ते दोन महिन्यांपूर्वी पदावर आरूढ झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी किरण, हिमांशु (6), मानसी (4) ही अपत्ये आणि भाऊ असा आप्तपरिवार आहे. मंगेश वामनराव म्हात्रे (40) हे गेल्या साडेतीन वर्षांपासून ढाकूलगावच्या सरपंचपदाचा कार्यभार सांभाळत होते. त्यांच्या पश्चात पत्नी अश्विनी, सार्थक (4) असा परिवार आहे. वाठोडा येथील सरपंचपदाचा कार्यभार नरेंद्र बहुरूपी (35) यांनी वर्षांपूर्वी हाती घेतला होता. त्यांच्यावर तालुका सरपंच संघटनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. ती सांभाळत त्यांनी मोठी संघटनशक्ती निर्माण केली होती. त्यांच्या पश्चात वृद्ध आई-वडील, पत्नी सुहासिनी आणि ओम (6), मोहिनी (4) ही अपत्ये आहेत. मूळचे गुंजी येथील भूविकास बँकेचे कर्मचारी अरुण शंकरराव टाले (45) यांचाही मृतांमध्ये समावेश आहे. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता, मुलगा विनित, मुलगी गुंजन असा परिवार आहे.


जखमींवर उपचार सुरू
अरुण टाले यांच्या पत्नी तथा गुंजी येथील सरपंच अनिता टाले (41), आदर्श गाव झाडा येथील सरपंच अतुल कोंबे (38), वाहनचालक प्रवीण भलावी (25, रा. झाडा), दाभाडा येथील सरपंच योगिता मुकुंद कोकाटे हे अपघातात जखमी झाले आहेत. अकोला येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.


अश्रूंना दिली वाट
अपघाताची बातमी धामणगावात पोहोचताच संपूर्ण तालुक्यात शोककळा पसरली. गुंजी, ढाकूलगाव, वाठोडा व जुना धामणगाव येथे आज चुली पेटल्या नाहीत. मृतकांच्या कुटुंबीयांसह गावकर्‍यांनी अश्रूला वाट मोकळी केली. या अपघाताने समाजमन सुन्न झाले आहे.