आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Amravati News On Politics, Amravati Municipal Corporation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राजकीय नाट्य : साफसफाईच्या मुद्द्यावरून महापालिकेत बनवाबनवी!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - दैनंदिन साफसफाई यंत्रणेत सुसूत्रता आणण्याचे धोरण महापालिकेच्या स्वच्छता विभागाने तयार केले आहे. हे धोरण 18 ऑक्टोबर 2013 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात आले होते. नवीन धोरणामध्ये चार टप्प्यांमध्ये घनकचरा व्यवस्थापन करण्याचे प्रस्तावित आहे. मागील पाच महिन्यांपासून या विषयावर चर्चाच होऊ शकली नाही.


गुरुवारच्या सभेत प्रश्‍नोत्तराचा तास संपल्यानंतर प्रामुख्याने या विषयावर चर्चा आरंभ करण्यात आली. हा विषय सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आल्यानंतर 13 नोव्हेंबर 2013 रोजी स्थायी समिती बैठकीत संमत झालेल्या घनकचरा उचलण्याच्या कंत्राटाला मुदतवाढ देण्यात आली. ही मुदतवाढ चक्क एक वर्षासाठी देण्यात आल्याने, या वेळी झालेल्या चर्चेत वरिष्ठ सदस्य डॉ. कांचन ग्रेसपुंजे यांनी आक्षेप घेतला. एक वर्षांची मुदतवाढ दिली जात असते का, असा प्रo्न त्यांनी उपस्थित केला. ही मुदतवाढ नाही, तर एकप्रकारे नव्याने कंत्राट दिला असल्याचे त्या म्हणाल्या. यावर वैद्यकीय आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. देवेंद्र गुल्हाने यांनी चुप्पी साधल्याने डॉ. ग्रेसपुंजे चांगल्याच संतापल्या. यावर माजी महापौर विलास इंगोले यांनीदेखील ‘डॉक्टर तुम्ही आता अडचणीत आले’ अशी कोटी केल्याने याला चांगलेच बळ मिळाले. अधिकारकक्षेत येते म्हणून चुकीचे निर्णय घेणार का, असा सवालदेखील त्यांनी यावेळी केला. चर्चेला सुरुवात करीत प्रकाश बनसोड यांनी नियमित सफाई कर्मचारी किती आणि ते काम करतात का, असा प्रश्‍न उपस्थित केला. नियमित कर्मचारी कर्तव्याच्या वेळेत साफसफाई करीत नसून, त्याचा भार कंत्राटी कामगारांवर पडत असल्याचे ते म्हणाले. एका प्रभागात संपूर्ण सफाई कामगारांकडून करून घेण्याचे त्यांनी सूचवले. त्याची सुरुवात त्यांचाच प्रभागात केली जावी आणि प्रशासनाने ते करुन दाखवावे, असेही ते म्हणाले. नियमित सफाई कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचार्‍यांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची सूचना त्यांनी केली. मुस्लिम क्षेत्रात नियमित कर्मचारी येतच नसल्याची तक्रार शहर सुधार समिती सभापती हमीद शद्दा आणि मो. इमरान मो. याकूब यांनी केली. नियमित कर्मचार्‍यांची संपूर्ण माहिती सभागृहात ठेवण्याची मागणी करण्यात आली. त्याचप्रमाणे आठ तासांऐवजी चार तास करण्याला बहुतांश सदस्यांनी विरोध केला. मटन मार्केट जवळील सफाईबाबत वेगळे नियोजन केले जावे, आदी सदस्यांकडून आलेल्या सूचनांचा समावेश करीत धोरणात सुधारणा करण्याची मागणी केली. सर्वांचे मत लक्षात घेतल्यानंतर महापौर वंदना कंगाले यांनी पुढील आमसभेत संपूर्ण सुधारणांसह विषय ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. यावेळी झालेल्या चर्चेत पक्षनेते बबलू शेखावत, विरोधी पक्षनेते प्रा. प्रशांत वानखडे, गटनेते प्रकाश बनसोड, अविनाश मार्डीकर, प्रदीप बाजड, विलास इंगोले, डॉ. कांचन ग्रेसपुंजे, कुसूम साहू, अर्चना इंगोले, तूषार भारतीय, अजय सामदेकर, प्रवीण हरमकर, अरुण जयस्वाल, जयश्री मोरे, डॉ. राजेंद्र तायडे, शेख हमीद शद्दा, मो. इमरान मो. याकूब, निर्मला बोरकर आदी सदस्यांनी चर्चेच सहभाग घेतला.


महापौर लक्ष्मीचं रूप!
महापौर वंदना कंगाले यांच्या कार्यकाळात महापालिकेस मोठय़ा प्रमाणात निधी प्राप्त झाला असून, विकासकामांना वेग आला. त्या लक्ष्मीचं रूप असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ सदस्य प्रदीप बाजड यांनी व्यक्त केली. त्यावेळी कंगाल महापालिकेच्या कंगाले महापौर असा उल्लेख बाजड यांनी पूर्वी केला होता, याची आठवण अविनाश मार्डीकर यांनी या वेळी करून दिली.

35 सफाई कर्मचारी होणार बडतर्फ
महापालिकेत 772 सफाई कामगार नियमित असून, त्यातील कर्तव्यात कुचराई करणार्‍या 35 कर्मचार्‍यांवर बडतर्फीची कारवाई होईल, अशी माहिती आयुक्त अरुण डोंगरे यांनी सभागृहात दिली. दोनदा हजेरी घेण्यास त्यांनी सहमती दर्शवली. सफाई कंत्राटाला मुदतवाढ देणे फायद्याचे असून, निविदा प्रक्रिया राबविली असती, तर एक ते दीड कोटी रुपयांचा भुर्दंड पडला असता, असे आयुक्तांनी सर्वसाधारण सभेत स्पष्ट केले.