आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेत विकासाच्या नवसंकल्पनांवर होणार अमल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विकासाच्या ‘अमरावती पॅटर्न’चा राज्यात स्वीकार व्हावा, यासाठी महापालिकेत विकासाच्या नवनवीन संकल्पनांवर आगामी वर्षात अंमल केला जाणार आहे. ऑनलाइन मालमत्ता कर, ऑटो डीसीआर प्रणालीसारखे नवीन प्रयोग आगामी दिवसांमध्ये राबवले जातील. इमारत बांधकाम परवानगी आणि बाजार परवाना विभागापासून मिळणार्‍या उत्पन्नात वाढ करण्याचे उद्दिष्ट विभागप्रमुखांपुढे आहे.
मागील वर्षातील कामकाजाचे मूल्यमापन करण्यासाठी मनपा आयुक्त अरुण डोंगरे यांनी सर्व विभागप्रमुखांची नुकतीच सभागृहात बैठक घेतली. प्रशासकीय कामकाज करताना येणार्‍या अडचणींची माहिती विभागप्रमुखांकडून घेण्यात आली. मागील आर्थिक वर्षात मनपाला सर्वाधिक शासन निधी प्राप्त झाला. त्यामुळे मनपा क्षेत्राचा विकास होण्यास मदत मिळणार असल्याचे या वेळी सांगण्यात आले. ऑनलाइन मालमत्ता कर व किऑस्क प्रणाली सुरू केल्याने मालमत्ता करवसुलीत वाढ झाली आहे. ऑटो डीसीआर प्रणालीमुळे सहायक संचालक नगर रचना विभागाचे उत्पन्नही वाढले. स्थानिक संस्था कर विभागासह इमारत बांधकाम परवानगीशी संबंधित ऑटो डीसीआर, बाजार व परवाना विभाग हेदेखील प्रमुख उत्पन्नाचे स्रोत बनवण्याचे लक्ष्य विभागप्रमुखांना या बैठकीत देण्यात आले. ऑटो डीसीआर प्रणालीच्या नियमांनुसार आवश्यक नोंद करत बांधकामासाठी परवानगी देण्याबाबत सकारात्मक निर्णय आगामी काही दिवसांमध्ये घेतला जाण्याची शक्यता आहे. बाजार व परवाना विभागामध्येही बदल करून उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न होणार आहे. विविध विकासकामांसाठी मिळालेल्या निधीसह स्टार बसेसही मनपाला मिळाल्या आहेत. अपुर्‍या मनुष्यबळामध्ये प्रशासकीय कामकाजात अनेक अडचणी येत असताना उत्पन्नवाढीचे कसब विभागप्रमुखांना दाखवावे लागणार आहे. त्यामुळे ओरड होता कामा नये, याबाबतदेखील आयुक्तांनी विभागप्रमुखांना कानपिचक्या दिल्याची माहिती आहे.