आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीकर रोज 11 लाखांचे ‘गुपचूप’ करतात फस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - अमरावतीकर दररोज 11 लाखांची पाणीपुरी फस्त करतात. राजकमल, गांधीचौक, राजापेठ, गाडगेनगर आदी परिसरात नागरिकांची संध्याकाळी गाड्यांवर झुंबड उडते. पांढरे, थोडे तपकिरी रंगाचे ‘गुपचूप’, मिरची, पुदीना घातलेले अस्सल वैदर्भी ढंगाचे तिखट पाणी, चिंचेची आमटी नि सोबतीला बारीक कापलेला कांदा, मठ, वाटाणे घालून कुस्करलेला आलू अशा थाटातील ‘गुपचूप’ च्या गाड्या दररोज संध्याकाळी खवैया अमरावतीकरांची गर्दी खेचतात.

10 रुपयांना आठ व पाच रुपयांना चार गुपचूपसोबत आलू व काळे मिठाची एक पुरी मोफत असा दर अमरावतीकरांना पाठ आहे. चौकाचौकांतील गाड्यांवर खवय्ये एकावर एक पाणीपुरी रिचवत आंबट तिखट पाण्याचा आस्वाद घेतात नि नकळत 11 लाखांची उलाढाल घडवून आणतात. शहरातील मुख्य चौकात साधारण पाणीपुरीचे 500 व्यावसायिक आहेत. इतर गल्लीबोळांत 200 ते 250 छोट्या व्यावसायिकांच्या गाड्या आहेत. विक्रेत्यांच्या दररोजच्या मागणीनुसार ठोक माल पुरवणारे सुमारे 18 गृहउद्योग शहरात आहेत. एका गुपचूपच्या गाडीवर दिवसभरात साधारण 200 च्या जवळपास ग्राहक येतात. पूर्वी पाणीपुरी ज्याला घरी तयार करता येत होती, तेच लोक या व्यवसायात होते. आता मात्र पुरी विकत मिळत असल्याने केवळ पाणीच तयार करावे लागते. त्यामुळे गुपचूप विक्रेत्यांची संख्याही वाढली आहे.

मागेल तसा स्वाद
लहान मुलांना तिखट पाणी आवडत नाही त्यांना. आलू व चिंचेचा स्वाद असलेली पाणीपुरी दिली जाते. काही शेवपुरी, दहीपुरीचे चाहते असतात. काहींना केवळ आलू व काळेमीठ लावलेली पाणीपुरी आवडते. ग्राहकांच्या मागणीवरून पाणीपुरीसाठी लागणारे पदार्थ ठेवावे लागतात.

‘गुपचूप’ या नावाच्या गंमतीविषयी काही
विक्रे त्यांनी माहिती दिली की, ग्राहकांनाही इतर खाद्यपदार्थांच्या ऑर्डरसारखी वाट पाहावी लागत नाही. अगदी उभे राहूनच 20 रुपयांची पाणीपुरी तो दोन मिनिटांत खाऊ शकतो.

पाण्याचे शौकीन
पुदिना, चिंच, कोथींबीर, लसून, हिरवी मिरची, काळे मिठ घालून केलेल्या तिखट पाण्याचे चाहते अधिक आहेत. ‘गुपचूप’ खाल्ल्यानंतर विक्रेत्याकडे तिखट पाण्यासाठी प्लेट पुढे करणारे शौकीन नाकावर घाम येईस्तोवर त्याचा आस्वाद घेतात. विदर्भात अमरावतीची पाणीपुरी सर्वांना आवडते, असे विक्रेते व ग्राहकांचे मत आहे. शौकिनांसाठी पाणी शिल्लकच बनवले जाते.