आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाडूंच्या विरहाने क्रीडांगणे व्याकुळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - ‘जो जे वांछिल तो ते लाहो.’ या पसायदानाच्या ओळीप्रमाणेच क्रीडांगणांमध्ये ज्याला जे हवे, ते देण्याची क्षमता असते. ते शहराचा आरसा, संस्कृतीचे प्रतिबिंब, संस्कारांची शाळा आणि सर्वांना आनंद देणारे हक्काचे ठिकाण असते. मात्र, आज या क्रीडांगणांची स्थिती त्यांच्या आजूबाजूला वावरणार्‍यांनीच अशी काही खिळखिळी केली आहे, की ते कोणाला काहीच देण्यास सर्मथ नाहीत. अंबानगरीत मैदानांसोबतच अन्य मोकळ्या जागा खेळाडूंच्या विरहाने व्याकुळ आहेत. मात्र, यांचा वापर इतर कामांसाठीच होत असल्याने विद्यार्थी तसेच होतकरू खेळाडूंना मात्र खेळापासून वंचित राहावे लागत आहे.

‘दिव्य मराठी’ने सुरू केलेल्या अभियानात आता क्रीडाप्रेमी अमरावतीकरही उतरले असून, शहरातील मैदाने आणि मोकळ्या जागांना संरक्षित करून त्या खेळांसाठी देण्याची मागणी होत आहे. मैदानांच्या दुरवस्थेला आपणच जबाबदार असून, यासाठी प्रत्येकानेच पुढाकार घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मैदाने अस्वच्छ करणार्‍यांना जबर दंड ठोठावण्यात यावा, अशा प्रतिक्रिया बुधवारी राजापेठ, अंबापेठ, रुक्मिणीनगर, बसस्थानक, गाडगेनगर, राजकमल चौकातील अनेक नागरिकांनी ‘दिव्य मराठी’कडे नोंदवल्या आहेत.

भावी पिढीसाठी मैदाने हवी
भावी पिढीच्या उज्‍जवल भविष्यासाठी शहरात मैदाने हवीतच. कुठलीही व्यक्ती ही मैदान किंवा क्रीडांगणावरूनच यशाची पहिली पायरी चढत जाते. आम्हाला बालपणी मैदानांनी घडवल. येणार्‍या पिढीचे भविष्यही येथे घडावे म्हणून मैदानं वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात सगळ्यांचा सहभाग आवश्यक आहे. शरद सरनाईक, सचिव, मैदान बचाव कृती समिती

मैदाने वाचायलाच हवीत
मैदाने वाचायलाच हवीत. कारण ही मैदानेच समाजावर संस्कार करीत असतात. मनपाने काही खुल्या जागा व क्रीडांगणांचा विकास करण्याची योजना आखली आहे. त्यामुळे भावी पिढीला मनसोक्त खेळता-बागडता येईल. अरुण डोंगरे, महानगरपालिका आयुक्त