आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती-पुणे प्रवास भाडे दोन हजार 500, ‘लक्झरिअस’ लुटीवर कोण घालणार वेसण ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- दिवाळीसाठी शहरात दाखल झालेल्या प्रवाशांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. शहरात दाखल होणार्‍यांच्या आणि शहराबाहेर जाणार्‍या प्रवाशांच्या संख्येत वाढ झाल्याने खासगी प्रवासी गाड्यांच्या दरांनी परिसीमा गाठली आहे. अमरावती ते पुणे जाण्यासाठी नियमित दराच्या मानाने प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागत असून, हे दर चक्क एका तिकिटासाठी दोन हजार 500 रुपयांवर गेल्याने त्यांचा खिसाच कापला गेला आहे. दुसरीकडे, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) मात्र यावर कसे नियंत्रण मिळवायचे, या बाबत अनभिज्ञ असल्याचे अधिकार्‍यांचेच म्हणणे आहे.

सण आणि उत्सवांचा काळ वगळता इतर वेळी पुण्याला जाण्यासाठी खासगी बसचे तिकीट 600 रुपये, तर ए.सी. बसचे तिकीट 800 ते 900 रुपये आकारले जाते. मात्र, सध्या हा दर थेट दुप्पट, तिपटीवर पोहोचला आहे. दरवर्षीच दिवाळीच्या कालखंडात खासगी बसचे दर वधारलेले असतात. सुट्यांची अडचण, पोहोचणे गरजेचे असल्यामुळे प्रवाशांचा नाइलाज असतो. या चढय़ा दरावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्याही शासकीय विभागाने आतापर्यंत कोणत्याही ठोस उपोययोजना केलेल्या नाहीत. आरटीओ वाहतूक व्यवस्था हाताळत असल्याने साहजिकच त्यांच्याकडे ही जबाबदारी असणे अपेक्षित आहे. धक्कादायक प्रकार म्हणजे, खासगी बसच्या तिकीट दरांवर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार आपल्याकडे आहेत किंवा नाही, हीच बाब आरटीओ अधिकार्‍यांना ज्ञात नाही. सध्या साध्या खासगी बसचे किमान भाडे 1400 रुपये, तर एसी बसचे भाडे दोन हजार 500 रुपये आकारले जात आहे. सहा ते 10 नोव्हेंबरपर्यंत हीच परिस्थिती कायम राहणार आहे. ‘दिव्य मराठी’चमूने आठ खासगी ट्रॅव्हल्स एजंटांशी संपर्क साधून तिकिटाबाबत विचारणा केली असता, हे वास्तव पुढे आले.

दहा हजार प्रवासी
शिक्षण किंवा नोकरीसाठी जवळपास नऊ ते 10 हजार अमरावतीकर पुण्यात वास्तव्यास आहेत. वर्षभर अमरावतीला नाही आले तरी दिवाळीला गावी जाण्याची प्रत्येकाचीच धडपड असते. 13 ते 14 तासांचा प्रवास असल्यामुळे तो आरामदायी हवा, अशी प्रवाशांची इच्छा असते.

अधिकारांबाबत पडताळणी करतो
खासगी बसच्या तिकिटांवर नियंत्रण नाही. त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार आम्हाला आहे किंवा नाही, ही बाब मला ज्ञात नाही. पडताळणी करून पाहावे लागेल. बहुदा हे अधिकार नसावे, असा अंदाज आहे. श्रीपाद वाडेकर, आरटीओ, अमरावती.

एका तिकिटात दोन्हीकडचे भाडे
दिवाळीपूर्वी अमरावतीहून पुण्यात जाणारे प्रवासी फारसे नसतात. तेथून येणार्‍यांसाठी गाडी बहुतांश रिकामी नेली जाते. दिवाळीनंतर पुण्याहून येणार्‍यांची संख्या नगण्य असते. अशावेळी रिकाम्या गाडीचे भाडे प्रवाशांकडून वसूल करण्यात येते. एकीकडून आमची बस अक्षरश: खाली जात असल्याने तेवढे भाडे घ्यावेच लागते. मेहराज खान पठाण, अध्यक्ष, अमरावती ट्रॅव्हल्स मल्टिपरपज असोसिएशन.