आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धन्य तो पुत्र जिजाईचा...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - ढोल-ताशांचा गजर अन् ‘जय भवानी, जय शिवाजी’च्या जयघोषाने बुधवारी अंबानगरी दुमदुमली होती. निमित्त होते युवक काँग्रेस व एनएसयूआयतर्फे शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीचे.

गाडगेनगर परिसरातून मिरवणूक काढण्यात आली. पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठय़ा उत्साहात या मिरवणुकीत सहभागी झाले होते. नेहरू मैदान येथे समारोप झाला. आमदार रावसाहेब शेखावत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीला प्रारंभ करण्यात आला.हाती भगवे ध्वज घेऊन आणि डोक्यावर फेटा चढवून मोठय़ा संख्येने कार्यकर्ते या उत्सवात सहभागी झाले होते. मिरवणुकीत ढोल पथक, लेझिम पथक, महिला भजनी मंडळाचाही सहभाग होता. या प्रसंगी चौकाचौकांत फुलांचा वर्षाव करण्यात आला. गाडगेनगर येथून राठीनगर, शेगाव नाका, कॉटन मार्केट चौक, विलासनगर, चौधरी चौक, जयस्तंभ, श्याम चौक, राजकमल चौक, नेहरू मैदान असा मिरवणुकीचा मार्ग होता.

वन व वन्यप्राण्यांच्या संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वाघ, हत्ती या प्राण्यांचे देखावे मिरवणुकीत सादर करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि ठिकठिकाणी तुतारी फुंकणारे मावळे अमरावतीकरांचे लक्ष वेधून घेत होते. या प्रसंगी मिरवणुकीत सहभागी मुलींनी गरबा नृत्य सादर केले.

नगरसेवक विलास इंगोले, बबलू शेखावत, अरुण जयस्वाल, अमोल ठाकरे, किशोर बोरकर, संजय अकर्ते, राजू भेले, अक्षय भुयार, राजा बांगडे, मनिंदर मोंगा, नीलेश नारळीकर, नीलेश येवतीकर, शक्ती राठोड यांच्यासह युवक काँग्रेस व जिल्हा एनएसयूआयचे पदाधिकारी, कार्यकर्ते शिवजयंती मिरवणुकीत मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. मिरवणूक पाहण्यासाठी चौकाचौकांत आबालवृद्धांनी मोठय़ा प्रमाणावर गर्दी केली होती.

देखाव्यातून वन्यजीव, वने संवर्धनाचा संदेश
मिरवणुकीत विविध देखावे सादर करण्यात आले होते. यात ऐतिहासिक प्रसंगाच्या देखाव्यांसोबतच वने आणि वन्यजिवांच्या रक्षणाचा संदेशही कार्यकर्त्यांनी दिला. या प्रसंगी पर्यावरणाचे रक्षण करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले.

कार्यकर्त्यांच्या जल्लोषात आमदारांचाही सहभाग
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत डीजे आणि ढोल-ताशांच्या तालावर कार्यकर्ते मनमुराद नाचले. आमदार रावसाहेब शेखावत यांनाही कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेतले. तरुणाईच्या जल्लोषात आमदार शेखावतही सहभागी झाले होते.