अमरावती- संत गाडगेबाबांची जन्मभू, कर्मभू अन् शिक्षणमहर्षी डॉ. पंजाबराव देशमुखांच्या कर्मभूमीतील अमरावती विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत सोहळ्यात यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींनीच बाजी मारली आहे. सुवर्ण, रौप्य, रोख पारितोषिक अशा एकूण 142 पुरस्कारांपैकी तब्बत 107 पुरस्कार मुलींनी पटकावले.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचा प्रशस्त हिरवागार परिसर मंगळवारी विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून गेला होता. निमित्त होते, तिसाव्या दीक्षांत सोहळ्याचे. सुमारे दोनशे किलोमीटरवर असलेल्या बुलडाणा जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेल्या देऊळगावराजापासून वर्धा जिल्ह्यात असलेल्या कारंजा घाडगेपर्यंत पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी सोहळ्यासाठी विद्यापीठात गर्दी केली होती. अत्यंत शिस्तबद्ध आणि दिमाखदार पद्धतीने दीक्षांत सोहळा जल्लोषात पार पडला.
मराठीचा प्रभाव
पदवीवर मराठी भाषेचा समावेश असावा, यासाठी झालेल्या आंदोलनाचा प्रभाव काहीसा समारंभावरही दिसला. संपूर्ण कार्यक्रम मराठीतूनच पार पाडण्यात आला.
एनएसएसची शिस्त
कार्यक्रमस्थळी येणार्या पाहुण्यांना, निमंत्रितांना त्यांच्या आसनापर्यंत नेण्याची जबाबदारी एनएसएसच्या विद्यार्थ्यांवर होती. शिस्तीचा अवलंब करीत विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी चोख बजावली. उपस्थितांनी याचे कौतुक केले.
.
अन् वीज गेली
सव्वादहाच्या सुमारास अधिष्ठाता डॉ. एफ. सी. रघुवंशी आचार्य पदवी मिळवणार्यांची नावे जाहीर करीतच होते, की भारनियमनाने आपले उपद्रवमूल्य दाखवले. विद्यापीठाच्या डिजास्टर मॅनेजमेंट चमूने तत्काळ धावाधाव करून जेनसेट सुरू केला व अवघ्या एक मिनिटात कार्यक्रम सुरू झाला.
14 लाखांचा खर्च
तिसाव्या दीक्षांत सोहळ्यावर विद्यापीठाचा सुमारे 14 लाख रुपयांचा खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पदव्यांची छपाई, मुख्य पदवीदान सोहळा, पाहुण्यांचा आवागमन खर्च, पदाधिकार्यांचे भत्ते, भोजन खर्च, चहा-नाश्ता, साहित्य छपाई आदींचा यात समावेश आहे.
अमरावती विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत सोहळ्यात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. जयकिरण तिडके.