आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहरात होणार "सायन्स पार्क'! विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेकडून तत्त्वत: मंजुरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- अमरावतीत सायन्स पार्क निर्माण करण्याबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. सायन्स पार्कची शक्यता तपासणीसाठी गठित समितीच्या शिफारशींना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापनाकडून तत्त्वत: मंजुरी मिळाली आहे. सायन्स पार्क निर्मितीबाबत विद्यापीठाकडून राज्य शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे.
विज्ञानातील कठीण वाटणारे प्रयोग प्रात्यक्षिकांमुळे अगदी सोपे होण्यास मदत होते. अशा विविध प्रयोगांचा समावेश असलेले मॉडेल्स सायन्स पार्कमध्ये ठेवले जातात. विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक जिज्ञासा निर्माण व्हावी म्हणून प्रत्येक विभाग स्तरावर सायन्स पार्क निर्माण करण्याबाबत शासनस्तरावरून प्रयत्न केले जात आहेत. विदर्भात नागपूर येथे एकमेव रमण सायन्स सेंटर आहे. पश्चिम विदर्भातील महत्त्वपूर्ण शहर असतानादेखील अमरावतीत अद्यापही सायन्स पार्क निर्मितीबाबत चर्चा झाली नाही. त्यामुळे अमरावतीत सायन्स पार्क निर्माण करता यावे म्हणून शिक्षण संचालनाकडून विद्यापीठाला दोन जुलै २०१४ रोजी पत्र देण्यात आले. सायन्स पार्क निर्माण करण्याबाबत सर्वंकष प्रस्ताव तयार करणे तसेच पार्क निर्मितीची शक्यता तपासण्याबाबत समितीचे गठण करण्यात आले होते. बायो टेक्नॉलॉजी विभाग प्रमुख डॉ. प्रशांत ठाकरे सहयोगी प्राध्यापक डॉ. मो. अतिक यांचा समावेश असलेल्या समितीकडून याबाबतची शक्यता तपासण्यात आली. दोन सदस्यीय समितीने पिंपरी-चिंचवड आणि सोलापूर येथील सायन्स पार्कच्या अभ्यासदेखील केला. अधिक उत्पन्न स्तर असलेली महापालिका असल्याने पिंपरी-चिंचवड येथील सायन्स पार्कचे उत्पन्न साहजिकच जास्त आहे. स्थानिक उद्योगांविषयी माहिती देताना ऑटोमोबाइल क्षेत्रातील उत्कृष्ट मॉडेल्स तेथे आहेत, तर दुसरीकडे कमी उत्पन्न स्तर असलेल्या सोलापूर येथील सायन्स पार्क चालवताना तेथील प्रशासनाला कसरत करावी लागत असल्याचे समितीने अहवालातून निदर्शनास आणून दिले. सायन्स पार्क निर्मितीबाबतचा अहवाल समितीकडून व्यवस्थापन परिषदेसमोर ठेवला होता.

व्यवस्थापन परिषदेनेदेखील त्यावर शिक्कामोर्तब केल्याने सायन्स पार्क निर्माण होण्यास गती मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पश्चिम विदर्भासाठी उपलब्धी मागास असलेल्या पश्चिम विदर्भातील अनेक विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या या वेगळ्या ज्ञानापासून वंचित राहावे लागते. खासगी संस्था शैक्षणिक सहलींच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान कळावे म्हणून सायन्स पार्कला भेटीचे नियोजन करतात. त्या तुलनेत शासकीय शाळेतील विद्यार्थी वंचित राहतात. सायन्स पार्क दाखवायचा असेल, तर पश्चिम विदर्भातील अनेक शाळांना पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई किंवा नागपूर याशिवाय पर्याय नाही. अमरावती येथे सायन्स पार्कची निर्मिती झाल्यास अनेक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार, यात शंका नाही.

पुढे काय?
सायन्सपार्क निर्माण करण्याबाबत संत गाडगेबाबा अमरावती िवद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने तत्त्वत: मान्यता दिली आहे. याबाबत तयार करण्यात आलेला प्रस्ताव शासनाकडे पाठवला जाणार आहे. शासनाकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पार्क निर्मितीचा मार्ग मोकळा होईल.

राजीव गांधी सायन्स अँड टेक्नॉलॉजी कमिटीकडून सायन्स पार्क निर्मितीसाठी ५० टक्के अनुदान दिले जाते. मात्र, जागा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही स्थानिक प्रशासनाची आहे. विद्यापीठ मनपाकडून कार्यन्वयन होणे अपेक्षित आहे. विद्यापीठाच्या प्रस्तावानंतर मंजुरी मिळून मार्ग मोकळा होईल.
सायन्स पार्क अमरावतीत यशस्वी होईल किंवा नाही, याची शक्यतादेखील समितीकडून तपासण्यात आली. सायन्स पार्ककरिता स्वतंत्र यंत्रणा असणे गरजेचे असल्याचे मत समितीकडून अहवालात नमूद करण्यात आले. विद्यापीठाच्या यंत्रणेवर अवलंबून राहता स्वतंत्र यंत्रणा दिली जावी, अशी शिफारसही समितीकडून केली आहे. स्वतंत्र यंत्रणा असल्यास त्याची निगा राखणे शक्य होणार असल्याचे अहवालात नमूद आहे.

काय आहे ही संकल्पना?
मानवीसंस्कृतीमध्ये आमुलाग्र बदल घडवून आणणाऱ्या शोधांविषयी चिमुकल्यांपासून सर्वांनाच उत्सुकता असते. सायन्स पार्कमध्ये त्याबाबत सर्वंकष माहिती देण्याचा प्रयत्न होतो. विज्ञानविषयक माहिती व्हावी म्हणून शास्त्रज्ञांचे पुतळे पार्कमध्ये उभारले जातात. सोप्या पद्धतीने विज्ञान सांगणाऱ्या मॉडेल्सचा त्यात समावेश असतो. जिज्ञासा निर्माण करणारे प्रयोग तसेच विविध माहिती देणाऱ्या प्रतिकृतींशिवाय स्थानिक प्रगती दर्शवणाऱ्या मॉडेल्सचा समावेशही या सायन्स पार्कमध्ये केला जातो.