अमरावती - परीक्षेचे निकाल जाहीर झाल्यानंतर पुनर्मूल्यांकनाचे अर्ज स्वीकारण्यास थेट नकार देणार्या महाविद्यालयांच्या मुजोरीला चाप लावण्यात संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ पूर्णत: अपयशी ठरले आहे. यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रणालीही बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची डोकेदुखी वाढली आहे.
पुनर्मूल्यांकनाचे अर्ज स्वीकरण्यास महाविद्यालयांनी नकार दिल्यानंतर विद्यापीठाने ऑनलाईन व्यवस्था बंद केली. यामुळे पुनर्मूल्यांकनाचे अर्ज दाखल करण्यासाठी सतत कराव्या लागणार्या अमरावतीच्या वार्या यांमुळे सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्याच खिशाला चाट बसत आहे. अमरावतीच्या प्रत्येक फेरीमागे विद्यार्थ्याला किमान 250 ते 350 रुपयांचा भुर्दंड सोसावा लागत आहे. विद्यापीठाचे परीक्षा अर्ज महाविद्यालयांकडून स्वीकारले जातात. त्यासाठी एम-कार्ड पद्धतीचा वापर केला जातो. पुनर्मूल्यांकनाचे अर्ज स्वीकारण्यासाठी मध्यंतरीच्या काळात विद्यापीठाने ऑनलाइन अर्ज प्रणाली विकसित केली होती. त्यातील त्रुटी सुधारण्याऐवजी ऑनलाइन अर्ज स्वीकृतीच बंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना कितीही मनस्ताप झाला, तरी आम्ही सुविधा देणार नाही, असा संकल्पच जणू विद्यापीठ प्रशासनाने केलेला दिसतोय.
त्रुटी असल्याने सेवा बंद
पुनर्मूल्यांकनाचे अर्ज ऑनलाइन दाखल करण्याची सुविधा अगोदर उपलब्ध होती. परंतु, त्यात त्रुटी असल्याने ही सुविधा बंद केली. परीक्षा विभागाने म्हटल्यास आम्ही तत्काळ सुविधा उपलब्ध करून देऊ.’’ नितीन कोळी, संगणक विभागप्रमुख