आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravati University News In Marathi, Mohan Khedkar, Divya Marathi

कुलगुरूंवर अद्यापही दोन संकट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - गुणवाढ प्रकरणातून क्लीन चीट मिळाल्यानंतर कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांच्यावरील केवळ एक संकट टळले. दोन संकटांची टांगती तलवार अद्यापही त्यांच्यावर कायम आहे.
पदाचा गैरवापर करीत कन्या मृणालचे गुण वाढवून घेतले, असा आरोप डॉ. खेडकर यांच्यावर होता. या प्रकरणी दोन स्वतंत्र समित्यांनी चौकशी केली. अधिसभेने नियुक्त केलेल्या प्राचार्य डॉ. एफ. सी. रघुवंशी समितीने गुणवाढ प्रकरणात अनेकांना दोषी ठरवले, तर परीक्षेतील गैरप्रकारांची चौकशी करण्यासाठी बोर्ड ऑफ एज्युकेशनच्या 32/6 समितीला या प्रकरणात कोणतेही ठोस पुरावे न आढळल्याने त्यांनी कुलगुरूंसह सर्वांनाच निदरेष ठरवले. डॉ. रघुवंशी समितीच्या अहवालाला सिनेटने केव्हाच केराच्या टोपलीत टाकला आहे. 32/6 समितीचा अहवाल राज्यपालांकडे लवकरच जाणार आहे. त्यामुळे डॉ. खेडकर परत पदावर रुजू होतील, असा दावा केला जात होता. परंतु, अद्यापही डॉ. खेडकर यांच्यावर दोन मोठी संकटे घोंघावत आहेत.

फसवणूक करून बांधाबांध भत्ता घेतल्याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध न्यायालयाच्या आदेशान्वये नुकताच गुन्हा दाखल झाला आहे. दुसरीकडे सिनेटमध्ये राज्यपालनामित सदस्य सी. डी. देशमुख यांनी पदाचा गैरवापर करीत असल्याने डॉ. खेडकर यांना राज्यपालांनी हटवावे, असा डिसेन्ट प्रस्ताव ठेवला आहे. तोदेखील राज्यपालांकडे विचाराधीन आहे. आपल्याला पोलिसांनी अटक केल्यास नियमाप्रमाणे दोन्ही ठिकाणच्या सरकारी सेवेवर गंडांतर येऊ शकते, याची जाणीव झाल्याने डॉ. खेडकर यांनी धावाधाव केली. तिकडे राज्य माहिती आयोगातही डॉ. खेडकर यांनी जाणीवपूर्वक खोटी माहिती द्यायला लावली, असा लेखी जबाब तत्कालीन वित्त व लेखा अधिकारी डॉ. आर. डी. सिकची यांनी केव्हाचाच नोंदवला. त्यामुळे चारही बाजूने ओढवलेल्या संकटांच्या मालिकांपैकी डॉ. खेडकर केवळ एका संकटातून बाहेर पडले आहेत. उर्वरित प्रकरणांचा फैसला अद्यापही व्हायचा आहे.

विद्यार्थी संघटनांची मोर्चेबांधणी
कुलगुरू डॉ. खेडकर विद्यापीठात पुन्हा रुजू झाल्यास विद्यार्थी संघटनांनी पुन्हा नव्याने आंदोलन सुरू करण्याची तयारी चालवली आहे. एनएसयूआय यात नेहमीप्रमाणे आघाडी घेणार आहे. याशिवाय डॉ. खेडकर परत आल्यास आंदोलन करू, अशी घोषणा दिनेश सूर्यवंशी यांनी केव्हाच केली होती.

तक्रारींचा पाढा सुरूच
कुलगुरू डॉ. खेडकर यांच्या विरोधात तक्रारीचा पाढा सुरूच आहे. सर्वसामान्यांशी उद्धटपणे वागणूक करणे, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना कक्षात बोलावून धमकावणे, त्यांना विद्यापीठात पाय न ठेवण्याची तंबी देणे, सहकारी अधिकारी, कर्मचार्‍यांशी उद्धटपणे बोलणे, अधिसभा, व्यवस्थापन परिषदेच्या सदस्यांशी अयोग्य वागणूक अशा अनेक तक्रारी अद्यापही राज्यपाल कार्यालयाला प्राप्तच होत आहेत. त्यामुळे राज्यपाल कार्यालयही विचारात पडले आहे.