आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठातील चार शाखांच्या उन्हाळी परीक्षा ‘ऑनलाइन’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभियांत्रिकीसह अन्य तीन शाखांच्या उन्हाळी परीक्षा ‘ऑनलाइन’ पद्धतीने होणार आहेत. यासाठी परीक्षा विभागाची तयारी सुरू झाली असून, परीक्षा मंडळ आणि व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर अंतिम मोहोर लागणार आहे. जानेवारी महिन्यात होणार्‍या व्यवस्थापन आणि परीक्षा मंडळाच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. परीक्षा पद्धतीतील गोपनीयता जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात येणार आहे.

विद्यापीठांतर्गत असलेल्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांना 2014 ची उन्हाळी परीक्षा ही ऑनलाइन पद्धतीने द्यावी लागणार आहे. याचवेळी अभियांत्रिकीसोबत औषधनिर्माणशास्त्र, गृहविज्ञान आणि लॉ या शाखांची परीक्षा या ‘ऑनलाइन’ होणार आहेत. अभियांत्रिकीचे एक लाख आणि उर्वरित तीन शाखांचे 10 हजार, असे एक लाख 10 हजार विद्यार्थी उन्हाळ्यात ऑनलाइन परीक्षा देण्याची शक्यता आहे. प्रायोगिक तत्त्वावर निर्णय घेण्यात येणार आहे. परीक्षा विभागाने सर्व तयारी केली आहे. 15 जानेवारीला परीक्षा मंडळ आणि 20 जानेवारीला होणार्‍या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.

अशी होईल ‘ऑनलाइन’ परीक्षा
परीक्षाकेंद्रांवर परीक्षा सुरू असताना पेपरच्या एक तासापूर्वी ऑनलाइन पद्धतीने संबंधित विषयाची प्रश्नपत्रिका टाकण्यात येईल. ही प्रश्नपत्रिका संबंधित केंद्रप्रमुखच पाहू शकतील. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील संबंधित अधिकारी केंद्रप्रमुखाला प्रश्नपत्रिका उघडण्यासाठी पासवर्ड देतील. त्या पासवर्डच्याच आधारे प्रश्नपत्रिका पाहता येईल. त्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेची झेरॉक्स प्रत काढून प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देण्यात येईल; तसेच पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांनी सोडवलेल्या उत्तरपत्रिका हाय स्पीड स्कॅनरच्या मदतीने स्कॅन करून संबंधित विषयाच्या शिक्षकांक डे पाठवण्यात येतील. या प्रक्रियेत वेळ वाचेल आणि गोपनीयता अधिक चांगल्या रीतीने पाळली जाईल, अशी माहिती जनसंपर्क अधिकारी विलास नांदूरकर यांनी दिली.

आमची तयारी पूर्ण
अभियांत्रिकीसोबत औषधनिर्माण शास्त्र, गृहविज्ञान आणि लॉच्या उन्हाळी परीक्षा (2014) ऑनलाइन घेण्याची तयारी पूर्ण केली आहे. याचवर्षी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा व्हाव्यात, असे माझे अंत:करणापासून प्रयत्न आहेत. आगामी महिन्यात परीक्षा मंडळ आणि व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होणार आहे. त्याबाबत हिरवा कंदील मिळाल्यास ऑनलाइन पद्धतीनेच परीक्षा होणार आहेत. प्रा. डॉ. जे. डी. वळते, परीक्षा नियंत्रक