आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिनेटची बैठक वादळी ठरणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - नव्या महाविद्यालयांना परवानगीच्या मुद्यावर अमरावती विद्यापीठाने शुक्रवारी बोलावलेली सिनेटची (अधिसभा) बैठक वादळी ठरण्याची चिन्हे आहेत. कुलगुरू आणि कुलसचिवांच्या वादग्रस्त वर्तनाचा मुद्दा हा वेळेवरच्या विषयानुसार उपस्थित करण्याची काही सदस्यांची योजना आहे. यानुसार, कुलगुरूंच्या राजीनाम्याची मागणी केली जाईल.

बदली भत्त्याची उचल व मुलीचे गुणवाढ प्रकरण या विषयांवरून कुलगुरू, तर स्वग्राम प्रवास भत्त्याच्या विषयावरून कुलसचिवांचे वागणे वादग्रस्त ठरले आहे. सिनेटच्या गेल्या बैठकीत हे मुद्दे गाजलेही होते. सी. डी. देशमुख यांनी ‘डायलेटरी मोशन’ आणून हा विषय लावून धरला होता; परंतु चर्चेअंती पीठासीन सभापती डॉ. मोहन खेडकर यांनी दिलेल्या आश्वासनानंतर तो मागे घेण्यात आला होता. ती बैठक आटोपून सुमारे सात महिन्यांचा कालावधी लोटल्यावरही विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणात ठोस पावले उचलली नाहीत. त्यामुळे उद्याच्या बैठकीत पुन्हा हा मुद्दा चर्चेत येणार आहे.

काय आहे प्रकरण ?
कायदेशीर तरतूद नसतानाही कुलगुरूंनी बदली भत्त्याची उचल केली आहे, तर प्रवास न करताही कुलसचिव प्रो. दिनेशकुमार जोशी यांनी स्वग्राम प्रवास सवलत घेतली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून या दोन्ही मुद्यांवर चर्चा सुरू होती. सिनेटच्या गेल्या बैठकीत हा विषय चर्चेला आला त्यानंतर दोन्ही अधिकार्‍यांनी रक्कम परत करून बचावाचा प्रयत्न केला. परंतु, रक्कम परत केली याचाच अर्थ त्यांनी गुन्हा केला, हे कबूल केल्याने त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी, अशी मागणी उठली आहे. मुळात या दोन्ही अधिकार्‍यांच्या बाबतीत कुलपती या नात्याने राज्यपाल कार्यालयापर्यंत तक्रारी झाल्या असून, कुलसचिव प्रकरणाची पोलिस चौकशीही झाली आहे. या चौकशीनुसार, त्यांच्यावर योग्य कारवाईचे निर्देशसुद्धा कुलपती कार्यालयाने दिले आहेत. मात्र, कुलगुरूंनी अद्यापही त्यासंदर्भात कठोर कारवाई केली नाही. दोन्ही अधिकारी एक-दुसर्‍याचा बचाव करत असल्याचा आरोप होत आहे.