आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एनएसयूआय’ने उधळली विद्यापीठाची सिनेट बैठक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - कुलगुरू डॉ. मोहन खेडकर यांच्या कन्येला इंजिनीअरिंगच्या परीक्षेत मिळालेल्या बेकायदा गुणवाढीची चौकशी करण्यात यावी, गैरप्रकाराची जबाबदारी स्वीकारत कुलगुरू डॉ. खेडकर यांच्यासह कुलसचिव दिनेश जोशी यांनी राजीनामा द्यावा, या मागणीसाठी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी थेट संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या सिनेट सभेत घुसखोरी केली.

सभेला सुरुवात झाल्यानंतर सभागृहात वेगवेगळ्या ठिकाणी बसलेले कार्यकर्ते कुलगुरूंच्या व्यासपीठापुढे आलेत. डॉ. खेडकर, जोशी यांच्या विरोधात घोषणाबाजी करीत त्यांनी सभेत व्यत्यय आणला. अचानक झालेल्या या नारेबाजीमुळे सभागृहात उपस्थित सर्वांनाच आश्चर्याचा धक्का असला. विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच कुणी तरी सिनेट सभेत घुसखोरी केली होती. या प्रकाराने व्यथित होऊन कुलगुरू डॉ. खेडकर यांनी दोन तासांसाठी सभा तहकूब केली व ते आपल्या कक्षाकडे निघून गेले.

कक्षातही ठिय्या : कुलगुरू सभागृहातून निघून गेल्यानंतर एनएसयूआयचे कार्यकर्ते त्यांच्या कक्षाजवळ पोहोचले. त्यांनी तेथे ठिय्या दिला. नारेबाजी होऊ लागल्याने डॉ. खेडकर यांनी शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावून घेतले. प्रभारी कुलगुरू डॉ. जयकिरण तिडके, कुलसचिव दिनेश जोशी, सिनेट सदस्य सोमेश्वर पुसदकर आदींनी आंदोलक अक्षय भुयार, अमोल इंगळे, ऋषी गावंडे, शुभम बारबुद्धे, संकेत कुलट, रोहित देशमुख, नीलेश नांदणे, सुरेश र्शीराव, पवन देशमुख, वैभव राऊत, अनिकेत उताणे, वैभव बोडे, प्रणव लेंडे, ऋषिराज मेटकर, आसिम खान यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

राजीनाम्याची मागणी
आंदोलकांनी विद्यापीठातील तीन गैरप्रकारप्रकरणी डॉ. खेडकर, जोशी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. कुलगुरूंनी त्याबाबत नकार दिल्यानंतर सिनेट सभा उधळल्याची माहिती कुलपती तथा राज्यपाल कार्यालयास पाठवावी, असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरला. बैठक संपल्यानंतर याबाबत फॅक्सने राज्यपाल कार्यालयास कळवण्यात येईल, असे लेखी आश्वासन घेतल्यानंतरच आंदोलक माघारी फिरले.

आमदार अडसूळ परतले
सिनेटची बैठक असल्याने सदस्य असलेले आमदार अभिजित अडसूळ विद्यापीठात पोहोचले होते. परंतु, गोंधळाला सुरुवात झाल्यानंतर अडसूळ यांना कुलगुरूंच्या कक्षातून आल्यापावलीच परतावे लागले. प्रकरण कोणतेही असो, कुणी दोषी असेल, तर कारवाई व्हायला पाहिजे, अशी आपलीही भूमिका असल्याची प्रतिक्रिया त्यांनी या वेळी पत्रकारांना दिली.