आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Amravatri City MLA Facing Problems After Breakup Alliance Of All Party

अमरावती शहरातील प्रस्थापित आमदारांना निवडणूक झाली कठीण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्यातील महायुती आणि आघाडीत फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील आठही आमदारांच्या विधानसभेच्या निवडणुकीतील अडचणी वाढल्या आहेत. यापूर्वी महायुतीविरुद्ध आघाडी, असा सामना रंगणार होता. मात्र, आता प्रत्येकच मतदारसंघात शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होणार असल्याने विद्यमान आमदारांना आता नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विजयात आडकाठी आणणारे स्पर्धक वाढल्याने प्रस्थापित आमदारांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही. शिवसेना आणि भाजपला तर तब्बल पंचवीस वर्षांनी स्वबळावर लढण्याचा प्रसंग ओढवल्याने निवडणूक जिंकण्यासाठी सर्वांनाच तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
धामणगाव रेल्वे - क्र. ३६
या मतदारसंघात भाजपने अरुण अडसड, शिवसेनेने सिद्धेश्वर चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसने अनिल आठवले यांना उमेदवारी दिल्याने काँग्रेसचे विद्यमान आमदार वीरेंद्र जगताप यांनाही निवडणुकीत आव्हान आहे. भाजपचे अडसड वगळता निवडणुकीत नव्या चेहऱ्यांचा प्रवेश अधिक आहे. त्यामुळे जगताप यांना खरे आव्हान अडसड आणि सिद्धेश्वर चव्हाण यांचेच आहे. या मतदारसंघात जनता विकासकामांना कौल देते का, हे बघणे मजेशीर ठरणार आहे.
बडनेरा क्र. ३७
काँग्रेसची साथ, भाजपने नगरसेवक तुषार भारतीय यांना दिलेली उमेदवारी आणि मागील तीन वर्षांपासून तयारी चालवलेले शिवसेनेचे संजय बंड यांच्यामुळे विद्यमान आमदार रवि राणा यांचा तिघांशीही होणारा सामना चुरशीचाच ठरणार आहे. आमदार राणा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तिकीट घेता युवा स्वाभिमानच्या झेंड्याखाली निवडणूक लढण्यास पसंती दिली. राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे
अमरावती - क्र. ३८
अमरावती मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार रावसाहेब शेखावत यांना भाजपचे डॉ. सुनील देशमुख, शिवसेनेचे प्रदीप बाजड आणि राष्ट्रवादीचे गणेश खारकर यांच्याशी लढावे लागणार आहे. गेल्या वेळी सुनील देशमुख जनविकास काँग्रेसकडून लढले, तर या वेळी भाजपची साथ असल्याने स्पर्धा वाढली आहे. नगरसेवक प्रदीप बाजड शिवसेनेचा झेंडा घेऊन मैदानात आहेत. महापालिकेच्या निवडणुकीत केलेल्या प्रचार शैलीच्या आधारावर बाजड ही निवडणूक लढत आहेत.
तिवसा - क्र. ३९
या मतदारसंघात काँग्रेसच्या विद्यमान आमदार यशोमती ठाकूर यांना त्यांच्या घरातूनच मोठे आव्हान मिळाले आहे. त्यांची सख्खी बहीण संयोगिता निंबाळकर निवडणूक रिंगणात आहे, तर भाजपचे दहा वर्षे आमदार राहिलेले साहेबराव तट्टे राष्ट्रवादीच्या तिकिटावर मैदानात आहेत. याव्यतिरिक्त शिवसेनेचे नाना वानखडे, भाजपच्या निवेदिता चौधरी, मनसेचे आकाश वऱ्हाडे अशा बहुरंगी लढतीत मतदार नेमके कुणाला कौल देतात, याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.
दर्यापूर - क्र. ४०
दर्यापूर मतदारसंघात नव्या चेहऱ्यांची भर पडल्याने शिवसेनेचे विद्यमान आमदार अभिजित अडसूळ यांना मागील निवडणुकीच्या तुलनेत ही निवडणूक अधिक गांभीर्याने घ्यावी लागणार आहे. या मतदारसंघात काँग्रेसने उमेदवारी दिलेले सिद्धार्थ वानखेडे हे पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आहेत, तर राष्ट्रवादीचे उमेदवार दिनेश बूब हेसुद्धा शिवसेनेचे माजी शहर प्रमुख आहेत. भाजपने रमेश बुंदिले हा नवा चेहरा दिला आहे, तर रिपाइंचे बळवंत वानखडे यांचेही मोठे आव्हान अडसुळांना राहणार आहे.

मेळघाट - क्र. ४१
यामतदारसंघात भाजपचे दहा वर्षे आमदार असलेले राजकुमार पटेल यांनी राष्ट्रवादीचे तिकीट घेतले आहे. लोकसभेच्या निवडणुकीत केवळ मेळघाट मतदारसंघातूनच राष्ट्रवादीला वीस हजार मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे विद्यमान काँग्रेसचे आमदार केवलराम काळे यांच्याकरिता ही निवडणूक अटीतटीची झाली आहे. या व्यतिरिक्त भाजपचे प्रभुदास भिलावेकर आणि शिवसेनेचे मोतीलाल कासदेकर हे उमेदवार रिंगणात आहेत.
अचलपूर क्रमांक ४२
काँग्रेसच्या माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख राष्ट्रवादीच्या तिकिटावर, तर राष्ट्रवादीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा ठाकरे शिवसेनेच्या झेंड्याखाली अशा विपरीत राजकीय समीकरणात काँग्रेसने बबलू देशमुख यांना तिकीट दिले आहे, तर भाजपनेही सामाजिक समीकरणाच्या आधारावर अशोक बन्सोड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे विद्यमान आमदार बच्चू कडू यांना पंचरंगी लढतीतून मार्ग काढावा लागणार आहे. त्यामुळे सहज वाटणारी निवडणूक अंतिम टप्प्यात कोणत्या वळणावर जाईल, याचा अंदाज येणे कठीण आहे.