आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anandrao Adsul News In Marathi, Shiv Sena, Ajit Pawar, Divya Marathi

..तर करणार अजित पवारांचा बंदोबस्त, आनंदराव अडसूळांचा हल्लाबोल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - रालोआची सत्ता आल्यास सिंचनासाठी मिळालेल्या निधीवर डल्ला मारणार्‍या अजित पवारांचा बंदोबस्त करणार, असा इशारा अमरावती मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांनी दिला आहे. सत्ता आणि पैशांचा वापर करत पवारांनी अवैधतेला वैधतेचा साज चढवला आहे, असे वक्तव्य खासदार अडसूळ यांनी केले. सोमवारी (दि. 7) महायुतीचा जिल्ह्यातील वचननामा जाहीर करण्यात आला, त्यावेळी आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते.
पक्षाच्या प्रचार कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार प्रवीण पोटे, माजी खासदार अनंत गुढे, जिल्हाप्रमुख संजय बंड, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण पातूरकर, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश भारसाकळे, शहराध्यक्ष तुषार भारतीय, संजय अग्रवाल, महानगरप्रमुख दिगंबर डहाके यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.


वचननाम्यावर दृष्टिक्षेप : जिल्ह्यात पूर्वी मंजूर प्रकल्प पूर्ण . करणे, शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील सिंचनाचा अनुशेष भरणे, देशाच्या सीमांचे रक्षण करणार्‍या सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यावर वचननाम्यात प्राथमिकता देण्यात आली आहे. नदीजोड प्रकल्पामुळे शेतीला सिंचनासाठी पाणी मिळेल. शिवाय पाकिस्तान, बांग्लादेश, चीन, र्शीलंका आदी देशांकडून भारताविरुद्ध कारस्थान रचण्यात येत असल्याने असुरक्षितता निर्माण झाली आहे. त्यामुळे संरक्षण खर्चात प्राथमिकतेने वाढ केली जाईल.


यांसह बैतुल-चांदूरबाजार, अचलपूर-मूर्तिजापूर रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करणे, बीडीएलचा मिसाइल प्रकल्प सुरू करणे, मंजुरी मिळालेला एनटीसी गारमेंट प्रकल्प प्रत्यक्ष उभारणी करणे, विमान वाहतूक सेवा सुरू करणे, शेतमालावर आधारित कृषिप्रक्रिया उद्योग आरंभ करण्यास प्रयत्न करणे यांसह विविध अन्य विकासकामांचा समावेशही वचननाम्यात करण्यात आला आहे.


पुतण्या काकांवर भारी
पवार साहेब हे अजित पवारांना बळी पडत आहेत. राष्ट्रीय नेत्यांच्या सभेला केवळ पाच ते सहा हजार लोकांची गर्दी असणे, हे पराभवाचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले.


जाहीरनामा नव्हे, वचननामा
जाहीर करायचे; मात्र पूर्ण करायचे नाही त्याला काँग्रेस ‘जाहीरनामा’ म्हणते. मात्र, स्व. बाळासाहेब ठाकरेंनी वेगळा मार्ग काढत याला ‘वचननामा’ म्हटले आहे. याचा अर्थ दिलेले वचन पूर्ण केले जाणार असून, केंद्रात सत्ता आल्यास जिल्ह्यात नवीन प्रकल्प आणण्यासाठी प्रयत्न करणार, असे अडसूळ यांनी स्पष्ट केले.