आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anandrao Adsul News In Marathi, Shiv Sena, Anil Deshmukh, Divya Marathi

देशमुख-अडसूळ तू-तू-मै-मै,आचारसंहिता भंगाची तक्रार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री, राष्ट्रवादीचे अमरावती जिल्हा संपर्कप्रमुख अनिल देशमुख आणि शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्यात बुधवारी (दि. 9) आदर्श आचारसंहिता भंग केल्याच्या मुद्दय़ावरून चांगलीच तू-तू मै-मै झाली. अनिल देशमुख यांनी अमरावतीमधील एका हॉटेलमध्ये स्वस्त धान्य दुकानदारांना बोलावून गुप्त बैठक घेतली. या बैठकीत त्यांना राष्ट्रवादीच्या उमेदवाराबाबत काही सूचना देण्यात येत असल्याची माहिती मिळाल्याने आनंदराव अडसूळ, रिपाइंचे डॉ. राजेंद्र गवई हे त्यांच्या कार्यकर्त्यांसह हॉटेलमध्ये पोहोचले. या वेळी अनिल देशमुख आणि त्यांचे काही कार्यकर्ते खोली क्रमांक 318 समोर उभे होते. तेथे अडसूळ यांनी देशमुख यांना स्वस्त धान्य दुकानदारांच्या बैठकीबाबत विचारणा केली. सत्तेचा दुरुपयोग करून रेशन दुकानदारांची बैठक बोलावता, असा आरोप अडसूळ यांनी केला. मात्र, या ठिकाणी कोणत्याही प्रकारची बैठक झाली नाही, असे स्पष्टीकरण देशमुख यांनी दिले.
आचारसंहिता भंगाची केली तक्रार : रेशन दुकानदारांची बैठक घेऊन केलेल्या आचारसंहिता भंगाची लेखी तक्रार निवडणूक निर्णय अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे आनंदराव अडसूळ यांनी केली. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात असलेले निवडणूक निरीक्षक ए. के. शर्मा यांनी अडसूळ यांचे म्हणणे ऐकून हॉटेल गाठले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे चित्रीकरण तपासले. चित्रीकरणात अनिल देशमुख यांच्या खोली क्रमांक 318 च्या बाहेर मोठय़ा संख्येने लोक उभे असल्याचे दिसत आहे, हे शर्मा यांनी मान्य केले. या सर्व प्रकाराची चौकशी करण्यात येईल आणि आचारसंहिता भंग झाल्याचे आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे शर्मा यांनी सांगितले. तत्पूर्वी, पोलिस उपायुक्त सोमनाथ घार्गे, सहायक आयुक्त लतीफ तडवी हेसुद्धा ताफ्यासह हॉटेलमध्ये पोहोचले आणि कार्यकर्त्यांना बाहेर काढून परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, आचारसंहिता भंग केल्याच्या मुद्दय़ावरून शिवसेना, रिपाइं-भारिप-बमसंचे कार्यकर्ते संतप्त झाल्याने हॉटेलमधील वातावरण तापले होते. हा सर्व प्रकार सुरू असल्याची माहिती मिळाल्याने निवडणूक आयोगाचे कर्मचारी काझी तौफिकदेखील हॉटेलमध्ये त्यांच्या चित्रीकरण करणार्‍या चमूसह पोहोचले होते. हॉटेलमधून देशमुख यांची भेट घेऊन शेकडो लोक बाहेर पडत असल्याचे दृश्य आमच्या प्रतिनिधीनेही बघितले. त्यांना विचारणा केल्यानंतर जिल्ह्यातील अचलपूर, चांदूरबाजार, बडनेरा, दर्यापूर येथून हे स्वस्त धान्य दुकानदार अमरावतीत आले होते.
अनिल देशमुखांविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार : गुन्हा दाखल
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख हे प्रचार संपल्यानंतरही अमरावती जिल्ह्यात तळ ठोकून होते यामुळे आदर्श आचारसंहितेचा भंग झाला आहे अशी तक्रार जिल्हा निवडणुक निर्णय अधिकार्‍यामार्फत शहर कोतवाली पोलीसात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलीसात तक्रार दिल्याचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. तर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आलेल्या तक्रारीवरून आचारसंहिता भंग झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलीस आयुक्त सुरेश मेखला यांनी सांगितले.
तथ्य आढळल्यास कारवाई करू
निवडणूक निरीक्षकांनी दिलेल्या निर्देशानुसार हॉटेलचे सीसीटीव्ही चे फुटेज ताब्यात घेतले.आनंदराव अडसुळ यांनी दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी करू. तत्थ्य आढळल्यास आयोगाच्या निर्देशावरून पुढील कारवाई करू.’’ सोमनाथ घार्गे, पोलिस उपायुक्त
अनिल देशमुखांना अटक करा
मंत्री अनिल देशमुख यांनी स्वस्त धान्य दुकानदारांच्या माध्यमातून गैरप्रकार चालवला आहे. या प्रकरणी तात्काळ अनिल देशमुख यांना अटक करण्यात यावी.’’ डॉ. राजेंद्र गवई, उमेदवार, रिपाइं-भारिप-बमसं.