आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anganwadi Workers, Madatanisa March On Collector Office

अंगणवाडी सेविका, मदतनिसांची जिल्‍हाधिकारी कार्यालयार धडक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान शासनाने मान्य केलेल्या मागण्या अजूनही अंमलात न आणल्याच्या निषेधार्थ सहा जानेवारीपासून बेमुदत संपावर गेलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी शुक्रवारी दुपारी ऐनवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराओ घातला. या वेळी धरणे देत त्यांनी संतापाची चुणूक दाखवली. शासनाच्या विरोधात देण्यात आलेल्या घोषणांनी परिसर या वेळी दणाणून गेला.
दरम्यान, शनिवारी (दि. 1) जिल्हा परिषदेसमोरही अशीच कृती केली जाणार असल्याचे आंदोलकांनी निश्चिय केला आहे. त्यानंतर तीन फेब्रुवारी रोजी मुंबई येथे मोर्चा काढला जाईल, असे कृती समितीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. आयटक व सिटूच्या नेतृत्वातील अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनने सहा जानेवारीपासून अंगणवाड्यांच्या कामाचा बहिष्कार करीत संप सुरू केला आहे. या दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या अनेक बैठकी झाल्या. मात्र, शासनाने या आंदोलनाची दखल घेतली नाही. त्यामुळे अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी रोष व्यक्त केला असून, ऐनवेळी जिल्हाधिकारी कार्यालयाचा घेराओ केला.
कृती समितीचे पदाधिकारी बी. के. जाधव, रमेश सोनुले, सुभाष पांडे, प्रभाकर आकोटकर आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस मोठय़ा संख्येने सामील झाल्या. जोपर्यंत शासन मागण्यांची पूर्तता करणार नाही, तोपर्यंत आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. आंदोलनादरम्यान नवनीत राणा व गुणवंत देवपारे यांच्यासह अनेकांनी या वेळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. शनिवारी दुपारी जिल्हा परिषदेसमोरही धरणे आंदोलन केले जाणार असून, मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देणार असल्याचे संबंधितांनी कळवले आहे.