आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लक्ष्यवेधाचा खेळ, धनुर्विद्येत अमरावतीचा डंका

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राष्ट्रीय स्पर्धेत अमरावतीकरांनी अप्रतिम कामगिरीद्वारे धनुर्विद्येत अमीट असा ठसा उमटवला आहे. मागील वर्षभरात राष्ट्रीय, अखिल भारतीय आंतरविद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी झालेल्या निवड चाचण्यांमध्ये सुमारे 12 खेळाडूंनी नेत्रदीपक यश संपादन केले आहे.

काही दशकांपासून अंबानगरीत सातत्याने राष्ट्रीय स्पर्धा गाजवणारे धनुर्धर घडत होते. तांत्रिक मार्गदर्शन, वाढलेल्या सुविधांमुळे यंदा त्यात सुमारे 60 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ऋत्विक हातगावकरासारखे आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले धनुर्धरही या शहराने देशाला दिला आहे. भारतीय धनुर्विद्या महासंघाच्या पदाधिकार्‍यांसोबतच प्रशिक्षकांनीही अमरावतीच्या ऋत्विक, पूर्वा पल्लिवाल, तुषार मोहोड, यशदीप भोगे, प्रवीण जाधवसारख्या खेळाडूंकडून देशाला अपेक्षा असल्याचे मत व्यक्त केले आहे.

मागील दोन-तीन वर्षांत जिल्ह्यातील धनुर्धरांमध्ये मोठय़ा प्रमाणावर स्पर्धा वाढली आहे, असे क्रीडा क्षेत्रातील तज्ज्ञ सांगत आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता शेकडो खेळाडू पुढे येत आहेत. त्यांच्यातून दर्जेदार खेळाडूंची राष्ट्रीय, राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड होत असल्याने यशाची टक्केवारी वाढली आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय दर्जाचे माजी खेळाडू धनुर्विद्या अकादमीत प्रशिक्षण देत असल्याने त्यांचा अनुभव, तांत्रिक मार्गदर्शनाचा खेळाडूंना लाभ होत आहे. याच कारणास्तव
राज्य विशेषत: अमरावतीचे खेळाडू तांत्रिक बाबतीत देशात सर्वोत्तम ठरले आहेत. महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेच्या अध्यक्षपदी अँड. प्रशांत देशपांडे आणि सचिवपदी प्रमोद चांदुरकर असल्यामुळे तसेच त्यांचे जिल्ह्यातील धनुर्विद्या अकादमीशी सलोख्याचे संबंध असल्याने धनुर्विद्येचा चांगलाच विकास होत असल्याचे या खेळातील जाणकारांचे मत आहे.