आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादावादीत राष्ट्र‘वादी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी शहरात झालेली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक ताण-तणावाने चांगलीच गाजली. निरीक्षक आणि मंत्री अनिल देशमुख व आमदार प्रकाश डहाके यांना अक्षरश: कार्यकर्त्यांच्या रोषाला बळी पडावे लागले. कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना त्यांना केवळ ऐकूनच घ्याव्या लागल्या नाहीत, तर उमेदवारीबाबत अद्याप कोणताही अंतिम निर्णय झाला नसल्याची स्पष्ट ग्वाहीही द्यावी लागली. लोकसभा निवडणूकांपूर्वी राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांच्या धगधगत्या संतापाचा सामना पक्षातील वरिष्ठांना करावा लागला.

विविध कार्यक्रमांनिमित्त राष्ट्रवादी नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री अनिल देशमुख शुक्रवारी अमरावतीत आले होते. या वेळी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी माजी आमदार सुलभा खोडके यांच्या जनसंपर्क कार्यालयात बैठक घेतली.

पक्षाचे दुसरे निरीक्षक तथा विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रकाश डहाके, सुलभा खोडके, प्रदेश सचिव संजय खोडके, प्रल्हादराव सुंदरकर, जिल्हाध्यक्ष विजय भैसे व अँड. किशोर शेळके, माजी शहराध्यक्ष अविनाश मार्डीकर, उपमहापौर नंदू वर्‍हाडे, माजी उपमहापौर चेतन पवार यांच्यासह जवळपास सर्वच आघाड्यांचे प्रमुख पदाधिकारी बैठकीला उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी बडनेराचे आमदार रवि राणा यांची अर्धांगिनी नवनीत राणा यांना देण्यात आल्याच्या बातम्या आणि शहरात त्यांच्या कार्यकर्त्यांतर्फे सुरू असलेला प्रचार या मुद्दय़ांभोवती ही बैठक केंद्रित झाली होती. शरद पवार यांच्या विचारांना विरोध, राष्ट्रवादीच्या धोरणाला विरोध, प्रत्येक कार्यकर्त्याच्या कृतीवर कडाडून हल्ला, उपमहापौरांना मारहाण, शरद पवारांवर हल्ला करणार्‍या माथेफिरूचा उदो-उदो; असे एक नव्हे अनेक उदाहरणे देत कार्यकर्त्यांनी आमदार राणा यांच्या प्रचारतंत्राची जंत्रीच निरीक्षकांच्या पुढय़ात ठेवली. त्यामुळे नवनीत राणा यांना उमेदवारी दिली जाणार असेल, तर एकही कार्यकर्ता प्रचार करू शकणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. माजी उपमहापौर चेतन पवार यांनी मांडणीला सुरुवात केली. त्यानंतर प्रा. प्रशांत डवरे, मनोज केवले, गणेशदास गायकवाड, प्रा. संजय शिरभाते, रवींद्र वानखडे, अनिकेत देशमुख, जयर्शी मोरे, रिना नंदा, ममता आवारे, जुम्मा हसन नंदावाले, डॉ. विजय घाटोळ, गुड्डू मिर्शा, प्रा. संजय आसोले, जावेद मेमन, हमीद शद्दा, मिलिंद बांबल, नंदू हरणे, अँड. किशोर शेळके, अविनाश मार्डीकर या आजी-माजी पदाधिकार्‍यांनी आपापल्या तीव्र भावना व्यक्त केल्या.

चार नगरसेवकांचा पक्ष 22 वर
चार नगरसेवकांचा पक्ष पालिकेत 22 जागांवर पोहचवण्याची किमया खोडके दाम्पत्याच्या पर्शिमात असल्याचे कार्यकर्त्यांनी देशमुख यांना सांगितले. सत्ता महापालिकेची असो की जिल्हा परिषद-पंचायत समितीची, स्कूटरवर एकट्याने दौरा करून संजय आणि सुलभा खोडके यांनी हे यश खेचून आणल्याचेही कार्यकर्त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

सुंदरकर यांची स्थिती केविलवाणी
राणा यांना तिकीट मागण्याच्या प्रयत्नामध्ये जे-जे त्यांच्यासोबत गेले, त्यांच्या नावाचा उघडपणे उल्लेख झाल्याने काही काळासाठी वातावरण तणावपूर्ण झाले होते. सुंदरकर स्वत: या वेळी उपस्थित होते. त्यांनी काही बोलण्याचा प्रयत्न केला. परंतु, कार्यकर्त्यांनी तो हाणून पाडला. शेवटी खोडके दाम्पत्य व स्वत: अनिल देशमुख यांनी वातावरण शांत केले.

खोडके दाम्पत्याला पाठिंबा
संजय खोडके यांनी बैठकीत विचार मांडले. राणा यांना तिकीट मिळाल्याच्या बातम्या, अनिल देशमुख यांच्याकडेच बोट दाखवत - आपण मध्यस्थी करून पवार साहेबांशी त्यांची भेट करून दिल्याचे त्यांचे वक्तव्य आणि प्रल्हाद सुंदरकर, डॉ. गणेश खारकर, विलास इंगोले यांच्यासोबतचा त्यांचा फोटो, फॅक्स संदेशात नीलिमा महल्ले यांच्या नावाचा उल्लेख आदी सर्व बाबींचा अत्यंत परखडपणे खोडके यांनी समाचार घेतला.

कार्यकर्त्यांच्या राणांबद्दलच्या भावना जेवढय़ा तीव्र होत्या, त्यापेक्षाही जास्त खोडके दाम्पत्याबद्दलची त्यांची आपुलकी या वेळी व्यक्त झाली. सर्वांनी एका सुरात हात उंचावून ‘खोडके घेतील तो निर्णय अंतिम’ असा धोशा लावला. राणा यांना तिकीट दिल्यास मी पक्ष सोडणार नाही, पण स्वत: कामही करणार नाही, असे खोडके म्हणाले. सर्वांनी हात उंचावून आम्हीही तुमच्यासोबत असू, असे अभिवचन त्यांना दिले.

कृपया पक्षाची इभ्रत घालवू नका!
तिकीट देताना पक्षाने योग्य उमेदवार निवडावा. तसे न झाल्यास येथे कोणीही काम करू शकणार नाही आणि लोकं आपल्याला माफ करणार नाहीत. त्यामुळे पक्षाची इभ्रत घालवू नका, असा निर्वाणीचा इशाराही या वेळी देण्यात आला. 1999 ला पक्ष स्थापन झाला, तेव्हापासून येथे राष्ट्रवादीची पाळेमुळे घट्ट रुजली आहेत. त्याला खोदून काढण्याचे व हा एकसंध समूह फोडण्याचे पाप होऊ देऊ नका, अशी कळकळीची विनंतीही या प्रसंगी कार्यकर्त्यांनी केली.