आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे बरे होते का ते बरे होते

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजित पाटील यांची पोलिस आयुक्तपदीची कारकीर्द विविध कारणांसाठी गाजली. कर्मचार्‍यांमध्ये कमालीचे नैराश्य होते; परंतु चोर्‍या, वाटमार्‍या आणि गुन्हेगारांवर त्यांचा काही अंशी का असेना, वचक होता, असे म्हणण्याची वेळ आता अमरावतीकरांवर आली आहे. अजित पाटील यांची बदली झाल्यावर त्यांच्या जागी सुरेशकुमार मेकला यांची नियुक्ती झाली आणि अमरावतीकरांना वाटले, की एक चांगला आणि डॅशिंग पोलिस अधिकारी शहराला मिळाला आहे. परंतु, अमरावतीकरांची आशा आता निमाली आहे.
मागील काही दिवसांपासूनचा गुन्हेगारीचा वाढता आलेख पाहता, मेकला बरे का पाटील चांगले होते, अशी म्हणण्याची वेळ अमरावतीकरांवर आली आहे. मेकला यांनी आल्यावर सर्वप्रथम ‘व्हॉट् अँप’ हे मोबाइल अँप्लिकेशन अधिकारी आणि कर्मचार्‍यांना मोबाइलवर सक्तीचे करत घडलेल्या प्रत्येक घटनेची माहिती त्वरित त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आदेश दिले. यानंतर अमरावतीकरांना असे वाटले होते, की पोलिस दलानेही आता आधुनिकतेची कास धरल्याने गुन्हेगारी कमी होत अधिकारी आणि कर्मचारी कामाला लागतील. परंतु, केवळ नवीन मोबाइल खरेदी करत त्यावर नवीन सॉफ्टवेअर डाउनलोड केल्याने गुन्हेगारी थांबत नाही, हे आता साहेबांना कोण सांगणार? पोलिस अधिकारी आणि कर्मचारी नवीन मोबाइलवर मॅसेज पाठवण्यात गर्क आहेत आणि नागरिकांनाच आता ‘व्हॉट्स अप’ म्हणण्याची वेळ आली आहे. अमितेश कुमार यांच्या काळात अमरावतीकरांना खर्‍या अर्थाने पोलिसिंग म्हणजे काय, हे कळाले होते, तर पोलिस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनाही पोलिसिंगचा खरा अर्थ उमगला होता. शहरातील वाढत्या चोर्‍या थांबवण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशान्वये शहरात नाकाबंदी केली जात आहे. पोलिसिंग वाढवण्यात आली आहे. पोलिस जागे झाले, यात शंका नाही आणि दिवसभर काम केल्यावरपुन्हा ते नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी रात्र जागून काढत असल्याने त्यांच्या क्षमतेविषयी प्रश्नचिन्हही निर्माण होत नाही. मात्र, कॉलनीतील भाग सोडून केवळ मोठय़ा चौकाचौकांत नाकाबंदी करून काय हासिल होणार?
शहरातील अनेक भाग आजही एकमेकांना जोडलेले आहेत. या भागांतील रस्त्यांतून इतर भागात पळून जाणे अत्यंत सोपे आहे. हे पोलिसांच्या अद्यापही का ध्यानात येत नाही, कुणास ठाऊक! चोरटे चोरी केल्यावर मेनरोडने पळून जाणार का, हा साधा लॉजिकल प्रश्न आहे. मेकला यांनी स्वत: रस्त्यावर उतरून पोलिसांची गेलेली पत परत मिळवत अमितेश कुमार यांच्या प्रमाणे दबदबा निर्माण करण्याची गरज आहे. नागरिक सुरक्षित राहिले तरच पोलिसांच्या पोलिसिंगला महत्त्व आहे; अन्यथा याच्यापेक्षा ते बरे आणि त्यांच्यापेक्षा हे बरे, ही आकडेवारी करण्यातच नागरिक आणि पोलिस कर्मचार्‍यांचा वेळ खर्ची जाईल.