अमरावती- विधानसभा निवडणूक प्रक्रियेत संपूर्ण शासकीय यंत्रणा गुंतली आहे. मात्र, बंदोबस्ताचा पूर्ण भार पोलि सांवर असल्याने त्यांच्या हक्काच्या रजा बंद करण्यात आल्या असून, सणासुदीच्या काळातही पोलिस २४ तास ऑन ड्युटी असणार आहेत.
निवडणूक काळात बंदोबस्तासोबतच शांतता सुव्यवस्था कायम ठेवण्याचे आव्हान पोलिसांपुढे असते. निवडणुकीदरम्यान पुढे येणारे राजकीय हेवेदावे, यामुळे अनेकदा शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी पोलिसांनाच परिस्थिती सांभाळावी लागते. निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निघणाऱ्या प्रचार फेऱ्या, उमेदवारांच्या प्रचारासाठी येणारे स्टार प्रचारक, त्यांचे रोड शो, प्रचार फेऱ्या, त्यांच्या सभा या सर्व ठिकाणी पोलिसांना बंदोबस्तासाठी हजर राहावे लागते. यात पंतप्रधान, मंत्री यांसारख्या नेत्यांचा समावेश असेल तर तगडा बंदोबस्त द्यावा लागतो. निवडणूक काळात या सर्वांची हजेरी राहतेच. यातच अनेकदा एकाच दिवसात तीन ते चार स्टार प्रचारक शहरात येतात. अशा दिवशी पोलिसांची फारच दमछाक होते. निवडणूक काळात जागोजागी करावी लागणारी नाकाबंदी, या निवडणूक धावपळीसोबतच पोलिसांना जे नेहमीचे काम असते, तेसुद्धा पार पाडावे लागतेच. या वेळी मनुष्यबळ आहे, तेवढेच किंवा कमी मनुष्यबळातही पोलिसांना काम पार पाडावे लागते. मतदानापूर्वी किमान पंधरा दिवस पोलिसांना ही सर्व कामे करावी लागतात. यापेक्षाही कामाचा जास्त भार येतो, तो मतदानाच्या दोन दिवस पूर्वीपासून ते मतदान पूर्ण होईपर्यंत. कारण, या कालावधीत प्रत्येक मतदान केंद्रावर बंदोबस्त तैनात करण्यात आलेला असतो.
कुटुंबांकडे होतेय दुर्लक्ष
पोलिसांनानिवडणूक काळात असलेले अतिरिक्त काम पाहता त्यांना कुटुंबीयांनाही वेळ देता येत नाही. सणासुदीच्या काळात सर्वसामान्य नागरिक
आपापल्या परिवारासोबत सणाचा आनंद घेत असतात. त्याचवेळी पोलिस मात्र सर्वसामान्यांचा आनंद असाच द्विगुणित राहावा, यासाठी डोळ्यांत तेल घालून रस्त्यावर ड्युटी करत असतो. निवडणुकीच्या या धामधुमीतच यंदा दसरा आणि दिवाळी हे दोन्ही महत्त्वाचे सण आले आहेत. दसरा होऊन गेला; मात्र दिवाळी पुढे आहे. दिवाळीच्या तयारीसाठी पोलिसांना एक दिवसाचीही सवड मिळणे कठीण झाले आहे. कारण निवडणुकीमुळे पोलिसांच्या साप्ताहिक सुट्यासुद्धा बंद आहेत. अशावेळी त्या पोलिसांना कौटुंबिक जबाबदारीपेक्षा कर्तव्याला प्राधान्य द्यावे लागते. १९ ऑक्टोबरला मतमोजणी आटोपल्यानंतरच पोलिसांना दिवाळीच्या तयारीसाठी दोन ते तीन दिवस मिळणार आहेत.