अमरावती- जिल्ह्यात 91 अतिसंवेदनशील मतदान केंद्र असून, एकूण एक हजार 853 मतदान केंद्रांवर मतदान होणार आहे. या मतदान केंद्रांना ठाणेदारांनी भेट देऊन स्थानिक नागरिकांशी चर्चा करावी, असे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. सुरेश मेकला यांनी पत्रपरिषदेत दिले आहेत. निवडणूक काळात सर्वत्र शांतता सुव्यवस्था कायम राहावी, मतदारांना निर्भीडपणे मतदान करता यावे, यासाठी पोलिसांनी पूर्वीपासूनच तयारी चालवली आहे.
निवडणूक काळात अवैध दारू, मोठे आर्थिक व्यवहार, वाटप या बाबी होऊ नयेत किंवा झाल्यास पोलिसांना त्या बाबी लक्षात आणून देण्यात याव्या. यासाठी पोलिसांनी चोख व्यवस्था सक्षम यंत्रणा जिल्ह्यात तैनात केली आहे. दुर्गोत्सव काळात कोणत्याही राजकीय व्यक्तींनी धार्मिक कार्यक्रमांद्वारे राजकीय भाषण किंवा आचारसंहिता भंग होईल, असे कृत्य करू नये, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले. जिल्ह्यात आवश्यक अशा 14 ठिकाणी पोलिसांनी नाकाबंदी सुरू केली आहे. यामध्ये सीमेवरील नाकाबंदीचा समावेश आहे. जिल्ह्यात एकूण एक हजार 217 इमारतींमध्ये एक हजार 853 मतदान केंद्र राहणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्राला निवडणुकीपूर्वी ठाणेदारांनी भेट द्यावी, तसेच ज्या मतदान केंद्रांवर तीन किंवा त्यापेक्षा अधिक मतदान केंद्र असतील, अशा केंद्राला एसडीपीओंनी भेट द्यावी लागणार आहे. अतिसंवेदनशील मतदान केंद्राला अप्पर पोलिस अधीक्षक किंवा पोलिस अधीक्षक स्वत: भेट देणार आहेत. तिवसा, चांदूर रेल्वे, परतवाडा, मोर्शी, दर्यापूर आणि धारणी या ठिकाणी स्ट्राँग रूम राहणार असून, त्याच ठिकाणी मतमोजणी होणार आहे.