आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजपात "का रे हा दुरावा' जिल्ह्यातील पाच मतदारसंघांत बदलली राजकीय समीकरणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- राज्यातमहायुती आणि आघाडीमध्ये अनपेक्षित फूट पडल्यामुळे आता कोणत्या पक्षाकडून उमेदवारी घ्यावी, असा पेच जिल्ह्यातील तिकिटेच्छुक उमेदवारांना पडला आहे आणि यामुळे सैरभर झालेल्या सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची संपूर्ण दिवसभर चांगलीच दमछाक झाली.
निर्माण झालेल्या नव्या समीकरणानुसार, जिल्ह्यातील अचलपूर, अमरावती, बडनेरा, दर्यापूर आणि तिवसा या मतदारसंघांतील लढती अधिक रोचक झाल्या आहेत. अमरावतीमध्ये भाजपने डॉ. सुनील देशमुख यांना उमेदवारी दिली. देशमुख त्यांच्या काँग्रेसी फौजफाट्यासह नागपुरातील वाड्यावर शुक्रवारी भाजपमध्ये दाखल झाले. मात्र, यामुळे वर्षानुवर्षे अमरावतीत निष्ठेने कार्य करणारे भाजपचे कार्यकर्ते दुखावले. देशमुख यांची नवी फौज आणि दुखावलेल्या भाजपच्या समस्त कार्यकर्त्यांमध्ये सुसंवाद घडवून आणायला भाजपच्या नेत्यांना अक्षरश: कसरत करावी लागणार आहे. निष्ठावंत कार्यकर्त्यांवर पक्षाने अन्याय केला, या भावनेतून निवडणुकीत प्रचारापासून दूर राहण्याचा छुपा निर्णय भाजप कार्यकर्ते घेण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामुळे २९ सप्टेंबरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत देशमुख अँड कंपनीच्या निष्ठावान भाजप कार्यकर्त्यांसमवेत मनोमीलन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. देशमुख यांची लढत काँग्रेसचे रावसाहेब शेखावत आणि शिवसेनेचे प्रदीप बाजड यांच्याशी होणार आहे. राष्ट्रवादीने अमरावतीत अद्याप उमेदवारी दिलेली नाही. मात्र, संपूर्ण जिल्ह्यात अमरावतीची ही लढत गाजण्याची शक्यता आहे.
अचलपूरमध्येदोन ताया, दोन भाऊ
अचलपूरमतदारसंघात आमदार बच्चू कडू ,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शिवसेनेच्या सुरेखा ठाकरे, राष्ट्रवादीच्या वसुधा देशमुख आणि भाजपचे अशोक बनसोड असा पंचरंगी सामना रंगणार आहे. काँग्रेसच्या माजी मंत्री असलेल्या वसुधा देशमुख आणि काँग्रेसचे बबलू देशमुख यांच्यात होणाऱ्या मतविभाजनाचा लाभ कोणाच्या पथ्यावर पडणार? यामुळे या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे.
तिवसामध्येतीन ताया
एकनाही, दोन नाही, तर तब्बल तीन ताया तिवसा मतदारसंघात आमने सामने लढणार आहेत. काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीच्या संयोगिता निंबाळकर आणि भाजपच्या निवेदिता चौधरी या तिघी तिवस्यातून लढणार आहेत. पंधरा वर्षांपासून असलेली काँग्रेस-राष्ट्रावादी आघाडी तुटली आणि रक्ताच्या नात्यातील दोन सख्ख्या बहिणीचीही आघाडी संपुष्टात आली. त्यामुळे यशोमती आणि संयोगिता या दोघींमधला सामना राज्यात लक्षवेधी ठरणार, हे आता स्पष्ट झाले आहे.