आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंबा महोत्सवातील अदा, देशातील शंभर स्मार्ट सिटींमध्ये अंबानगरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ‘देशातील विविध शहरांचा अभ्यास करून केंद्र शासनाने शंभर स्मार्ट सिटींची नुकतीच घोषणा केली, त्यात अमरावती शहराचे नाव आहे. ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. संत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्यासारख्या संत-महापुरुषांचा वारसा लाभलेली पौराणिक, ऐतिहासिक अंबानगरी सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रातही अग्रेसर आहे. यामुळेच या शहराचा लौकिक संपूर्ण देशभरात आहे,’ असे प्रतिपादन खासदार आनंदराव अडसूळ यांनी केले. संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनमध्ये श्री अंबा महोत्सवाचा उद्घघाटन सोहळा नुकताच पार पडला. या वेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार अॅड. यशोमती ठाकूर यांच्या हस्ते अंबा महोत्सवाचे उद्घघाटन झाले.
शहराला लाभलेला वैभवशाली वारसा पुढे नेऊन स्थानिक कलावंतांना हक्काचे व्यासपीठ देण्याचे काम अंबा महोत्सवाच्या माध्यमातून होत आहे. शहराची आणखी प्रगती व्हावी, यासाठी येथील नागरिक लोकप्रतिनिधींनी समन्वय साधून विकासकार्याला हातभार लावणे आवश्यक असल्याचे मत अडसूळ यांनी व्यक्त केले. सात वर्षांपासून श्री अंबा महोत्सव कलाक्षेत्रात विदर्भाचे नेतृत्व करत आहे. या व्यासपीठाच्या माध्यमातून समाजकारणाचा पाया निर्माण केला जात असल्याचे आमदार यशोमती ठाकूर यांनी सांगितले. त्या उद््घाटक म्हणून बोलत होत्या. वैभवशाली परंपरा लाभलेल्या या शहरात चांगले समाजकारण व्हावे. त्यासाठी समाजावर उत्तम संस्कार झाले पाहिजेत, असेही त्या म्हणाल्या. महोत्सवाचे अध्यक्ष विलास मराठे यांनी प्रास्ताविकात उत्सवाची पार्श्वभूमी स्वरूप सांगितले. कोषाध्यक्ष दीपक अग्रवाल, माजी अध्यक्ष पप्पू पाटील, सचिव पंकज ठाकूर, नवीन चोरडिया, सुधीर गाडगे, प्रज्ञा महल्ले, मंजूषा जाधव, स्वाती बोरखडे, स्मिता जाधव, भावना महल्ले आदी या वेळी उपस्थित होते. प्रा. अश्विनी पारळकर यांनी कार्यक्रमाचे संचालन केले, तर सचिव प्रा. पंकज ठाकूर यांनी आभार मानले.
महोत्सवाच्या उद्घाटनाप्रसंगी खासदार अडसूळ यांनी शहराची महती विशद केली. दक्षिण मध्य क्षेत्रीय संस्कृती केंद्र नागपूरच्या वतीने वैदर्भीय लोककलांचे उत्कृष्ट सादरीकरण करण्यात आले.