आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हायटेक प्रचाराची रणनीती सुरू; मतदार राजा संभ्रमात,प्रचार कार्यालयांमध्ये दर्दी कार्यकर्त्यांची गर्दी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रतिनिधी- अमरावती; विधानसभेतील उमेदवार कोण, याचे चित्र शनिवारी स्पष्ट झाल्यानंतर सर्वच उमेदवारांनी आता प्रचारावर भर दिला आहे. त्यामुळे काही दिवसांपर्यंत ओसाड पडलेल्या या प्रचार कार्यालयांमध्ये आता कार्यकर्त्यांची वर्दळ वाढली आहे.
12 सप्टेंबरला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतरही प्रमुख पक्षांची प्रचार कार्यालये ओस पडली होती. महायुती आघाडीमध्ये जागावाटपावरून रंगलेले महायुद्ध हे काही तिसऱ्या महायुद्धापेक्षा कमी नव्हते. महायुती आघाडी तुटेल, की आहे तशीच राहील याच्या संभ्रमात कार्यकर्ते होते. याचा फटका निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊनही पक्षाच्या प्रचार कार्यालयावर दिसून पडला. 12 दिवस लोटूनही पक्ष कार्यालयांत शुकशुकाटच होता; परंतु शनिवारी (दि. 27) सगळे चित्र स्पष्ट झाल्याने पक्ष कार्यालयांत आता बसायला जागा कमी पडत आहे.
दरम्यान, जागावाटपाचा तिढा सुटता सुटेना, अशी चिन्हे होती. त्यामुळे नेत्यांसोबत कार्यकर्तेही पेचात पडले होते. सेना-भाजप यांची 25 वर्षांची महायुतीला अखेर फूट पडली, तर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसनेही एकमेकांपासून फारकत घेतल्याने अमरावती जिल्ह्याचे राजकीय चित्र पार बदलून गेले. त्यामुळे कार्यकर्त्यांना आता त्यांचे काम अधिक सोपे झाले आहे. ज्यांना उमेदवारांसोबत जायचे होते, ते गुपचाप आपल्या नेत्याच्या मागे गेले. तर ज्यांना पक्ष हवा होता, त्यांनी जो उमेदवार मिळेल, त्याचे काम करणार अशी भीष्मप्रतिज्ञाच गेली होती. त्यामुळे आता रविवारपासून निवडणुकीमध्ये आणखी रंगत येणार, हे मात्र निश्चित. जे पहिले एकमेकांचे सख्खे होते, ते दुश्मन झाले. तर जे दुश्मन होते, तेच आता चांगले मित्र झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे नेमकं मतदान कोणाला करायचं, या संभ्रमात मतदार राजा अडकून पडला आहे.
राजकीयफड रंगला
शनिवारीदुपारी तीन वाजता सगळ्याच प्रमुख पक्षांनी शक्तिप्रदर्शन करून नामांकन अर्ज भरला त्यानंतर पक्षाच्या प्रचार कार्यालयांमध्ये कार्यकर्त्यांमध्येच चर्चेचा चांगलाच फड रंगला. ‘का रे भाऊ, काय म्हणते भाऊंची पोजिशन? सगळं सुरळीत सुरू आहे नां? भाऊ, त्या भागात लक्ष द्या लागते, तिकडे जरा कमी पडत आहे आपण. का रे मित्रा, आपले भाऊ येतीन ना निवडून. यंदाची निवडणूक काही खरं नाही बावा. सर्वच पक्षानं आपले उमेदवार उभे केले ना लेका. कोण, कोणाले मत देईन काहीच सांगता येत नाही. काही पक्ष पाहून मत देतीन. माया इचारानं तर काही उमेदवार पाहून देतीन बावा. पण काही असो आपल्या भाऊचा माहोल लय जमके होता. पदयात्रा, फेरी, जनतेचा मजमा सारं काही येलबंल होत फारम भराच्या दिवशी. पण लेका १५ तारखेले जनतेला भाऊलेच निवडून द्यावं, अशी मायी इच्छा आहे. अबे तुईच इच्छा नाही पुऱ्या अमरावतीचीच तेच इच्छा आहे,’ अशा चर्चांचा फड सध्या प्रचार कार्यालयांत रंगत आहे.
इर्विन चौकालगतच्या भाजप कार्यालयातही मोठी लगबग सुरू झाली.