आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार प्रचारकांवर सेनेची मदार, नेत्यांच्या आगमनामुळे रणधुमाळीत रंगत वाढणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती-शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसेनेचे स्टार प्रचारक आदित्य ठाकरे, रामदास कदम नितीन बानगुडे पाटील यांच्या जिल्ह्यात जाहिर सभा होणार आहेत.
स्टार प्रचारक जिल्ह्यात जाहिर सभांना उपस्थिती लावणार असल्याने रणधुमाळीत रंगत वाढणार आहे.महायुतीच्या फुटीनंतर शिवसेनेकडून जिल्ह्यातील आठही मतदारसंघात सेनेने उमेदवार उभे केलेत. अमरावती जिल्हा बालेकिल्ला राहिला असल्याने येथून शिवसेनेला बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस अपक्षांनी मुसंडी मारली होती. दर्यापूर येथून एकमेव शिवसेनेचे अभिजीत अडसूळ यांचा विजय झाला होता.
मागील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारांवर काँग्रेस अपक्षांकडून मोठ्या मतांच्या फरकाने पराभव स्विकारण्याची वेळ आली होती. तिवस्यातून संजय बंड, बडनेरातून सुधीर सूर्यवंशी अचलपूर मतदार संघातून माजी खासदार अनंत गुढे यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. मागील निवडणुकीत शिवसेनेसोबत भारतीय जनता पक्ष होता; मात्र आगामी निवडणुकीत युती फुटल्याने अनेक वर्षांचे सोबती एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. शिवाय शिवसेनेसाेबत अन्य पक्षांनी देखील नवीन उमेदवार दिल्याने सर्वच मतदार संघात चुरस वाढली आहे. मागील निवडणुकीत तिवसा येथून मोठ्या फरकाने पराभव झाल्याने संजय बंड बडनेरा मतदार संघातून यावेळेस भाग्य आजमावत आहेत. बडनेरा मध्ये त्यांच्यासमोर विद्यमान आमदार रवि राणा, काँग्रेसच्या सुलभा खोडके, भाजपचे तुषार भारतीय, बसपाचे रवींद्र वैद्य यांच्यासोबत टक्कर द्यावी लागणार आहे. दर्यापूर मधून विद्यमान आमदार अभिजीत अडसूळ यांना देखील त्यांचा गड राखणे ऐवढे सोपे नाही.
कधीकाळचे दोन शिवसैनिक विविध पक्षाच्या चिन्हावर त्यांच्याविरोधात उभे ठाकले आहेत. सिद्धार्थ वानखडे यांना काँग्रेस तर दिनेश बुब यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. यासोबत अनेक दिवस मित्र असलेल्या भाजपने देखील रमेश बुंदेले यांच्या रुपाने उमेदवार येथे दिला आहे. अचलपूरमध्ये शिवसेनेकडून सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी मिळाली असली तरी त्याचे विजयात रुपांतर करण्यास बरीच कसरत करावी लागणार आहे.
विद्यमान आमदार बच्चू कडू, माजी मंत्री वसुधा देशमुख राष्ट्रवादी, भाजपकडून अनिल बनसोड तर काँग्रेसकडून बबलू देशमुख निवडणूक रिंगणात आहेत. दिग्गजांच्या उमेदवारीने येथे काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. मोठ्या फरकाने विजयी झालेल्या काँग्रेसच्या यशाेमती ठाकूर यांच्या विरोधात दिनेश नाना वानखडे यांना उमेदवारी मिळाली आहे.
भाजपकडून निवेदिता चौधरी, प्रहारच्या संयोगिता निंबाळकर, बसपाचे संजय लव्हाळे यांच्यासोबत विद्यमान आमदारासोबत त्यांना टक्कर द्यावी लागणार आहे. राष्ट्रीय नेतृत्व तसेच भाजपचा गड असल्याने धामणगाव रेल्वे मतदार संघात शिवसेनेला तसा वाव नाही, पूर्वाश्रमीचा बडनेरा मतदार संघाचा भाग असलेल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात सेना एकवटली आहे. निवडणुकीच्या त्रिसुत्रीत पॉवर फुल असलेल्या सिद्धेश्वर चव्हाण यांना आयात करण्याची वेळ शिवसेनेवर आली. शिवाय विद्यमान आमदार प्रा. विरेंद्र जगताप, भाजपचे अरुण अडसड, बसपाचे अभिजीत ढेपे यांचे तगडे आव्हान या मतदार संघात राहणार आहे.
मोर्शीत शिवसेनेकडून सर्व परिचीत उमेदवार दिल्याने विद्यमान आमदारांच्या अडचणी वाढणार आहेत. मात्र विद्यमान आमदार डॉ. अनिल बोंडे, माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख, नरेशचंद्र ठाकरे यांच्यासोबत दोन दोन हात करावे लागणार आहेत.
मेळघाटात शिवसेनेने मोतीलाल कास्देकर यांना उमेदवारी देत मतदार संघात नव्याने आव्हान निर्माण केले आहे. मात्र विद्यमान आमदार केवलराम काळे, राष्ट्रवादीचे राजकुमार पटेल तसेच भाजपचे प्रभुदास भिलावेकर यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतर शिवसैनिकांमध्ये निर्माण झालेली ऊर्जा मताधिक्यात परिवर्तीत काय, हा प्रश्न निर्माण होत आहे. परंतु, महायुती तुटल्यानंतर िशवसेना नेत्यांनी मतदारांना भावनीक साद घालण्यास सुरुवात केल्याने त्याचा मतदारांच्या मतांवर परिणाम हाेताे का याकडे साऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते रामदास कदम अमरावती जिल्ह्यात प्रचारासाठी येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.दर्यापूर, मोर्शी, नांदगाव खंडे. येथे त्यांच्या सभा होणार असल्याची माहिती आहे. तर शिवशाहीचे व्याख्याते प्रा. नितीन बानगुडे पाटील हे देखील उर्वरित मतदार संघात शिवसेनेसाठी प्रचारसभा घेणार असल्याची माहिती आहे.