आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागात 18 हजारांवर राहील पोलिस बंदोबस्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- विधानसभानिवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था कायम राहावी आणि निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी अमरावती विभागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. यात स्थानिक पोलिसांसोबतच गृहरक्षक दल, केंद्रीय पोलिस बलाच्या २९ तुकड्यांसह तब्बल अठरा हजार १२४ जवान जवळपास ८०० अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे.
अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये अमरावती शहर वगळता २८ मतदारसंघांचा समावेश आहे. या पाचही जिल्ह्यांतील पाच हजार ५७९ इमारतींमध्ये आठ हजार ६२८ मतदान केंद्र राहणार आहेत. यामध्ये ४१८ केंद्र हे संवेदनशील, ६५ केंद्र अतिसंवेदनशील तर १२१ केंद्र हे उपद्रवी केंद्र म्हणून पोलिसांकडे नोंद आहे. इतर मतदान केंद्रांच्या तुलनेत पोलिसांना संवेदनशील, असंवेदनशील उपद्रवी केंद्रांवर अधिक बंदोबस्त तैनात करावा लागतो. यावर्षी संपूर्ण राज्यात एकाच दिवशी मतदान होणार आहे, त्यामुळे स्थानिक पोलिसांना इतर जिल्ह्यांचा किंवा एसआरपीएफचा बंदोबस्त पुरेशा प्रमाणात मिळणे शक्य नव्हते. म्हणून केंद्रीय पोलिस दलाच्या बंदोबस्ताची मागणी करण्यात आली होती. त्यामुळेच अमरावती विभागात निवडणूक काळात बंदोबस्तासाठी तब्बल दोन हजार ९०० जवान केंद्राकडून मिळाले आहेत. यासोबतच ३४० अधिकारीसुद्धा बाहेरून बोलवण्यात आले आहेत. निवडणूक काळात शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात राहणार आहे. विभागातील सर्वाधिक दोन हजार ३३९ मतदान केंद्र हे यवतमाळ जिल्ह्यात असून, सर्वाधिक बंदोबस्तसुद्धा त्याच ठिकाणी देण्यात आला आहे. १२ ऑक्टोबरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात पोलिसांची अतिरिक्त कुमक पोहोचणार असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरीक्षक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे.