आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेनेला बसू शकतो गटबाजीचा फटका, सर्वच मतदारसंघांत सारखी स्थिती; कार्यकर्ते संभ्रमात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- उमेदवारीच्या स्पर्धेतून बाद झाल्यानंतर जिल्ह्यात शिवसेनेत नाराजांची फौज तयार झाली आहे. अनेक वर्षांपासून निष्ठेने काम करणाऱ्या शिवसैनिकांना डावलत आयात करण्यात आलेल्या नेत्यांना ऐनवेळी उमेदवारी दिल्याने शिवसेनेला काही ठिकाणी गटबाजीचा फटका बसण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे विरोधी गटातील नेत्याला तिकीट मिळाल्याने सेनेतील अनेकजण प्रचारापासून दुरावल्याचे दिसून येत आहे.
महायुती तुटल्यानंतर शिवसेना भाजप स्वतंत्रपणे जिल्ह्यातील आठ ही जागांवर लढत आहे. याचा फटका तर शिवसेना उमेदवारास बसणार आहेच, शिवाय अंतर्गत गटबाजीचा सामना करण्याची वेळ शिवसेना उमेदवारांवर येणार आहे. विरोधी गटातील नेत्याला उमेदवारी मिळाल्याने अन्य गट शांत असल्याचे राजकीय संकेत आहेत. विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळाल्याने शिवसेनेतील नेते समर्थक शिवसेनेच्या प्रचारापासून दूर असल्याचे चित्र आहे. शिवसेनेकडून तिकीट मागणाऱ्यांची यादी मोठी होती, प्रत्येक मतदार संघात केवळ एकाला पक्षाचे चिन्ह मिळाल्याने अनेकांची नाराजी होणे स्वाभाविक आहे. असाच काहीचा प्रकार शिवसेनेत देखील झाला.
शहरासह जिल्ह्यातील नेते शिवसेना उमेदवारांच्या प्रचारापासून दूर असल्याचे दिसून येत आहे. महायुतीमध्ये असताना चार मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला येणार होते, त्यामुळे त्याच चार मतदार संघात दावेदारांची संख्या देखील लांबलचक होती. यामध्ये प्रामुख्याने तिवसा, बडनेरा, दर्यापूर अचलपूर मतदार संघाचा समावेश आहे. अचलपूर धामणगाव रेल्वे मतदार संघात उमेदवार आयात केल्याने स्थानिक शिवसेना नेत्यांमध्ये नाराजी आहे. अचलपूर मतदार संघात अनेक दिवसांपासून निष्ठेने शिवसेनेचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून उमेदवारी मागण्यात आली होती. त्यामध्ये प्रामुख्याने नंदू वासनकर, प्रदीप पाटील या स्थानिक नेत्यांचा समावेश होता. मात्र सुरेखा ठाकरे यांना उमेदवारी दिल्याने निष्ठावांत शिवसैनिकांच्या मनात असंतोष खदखदत आहे. बडनेरा मतदार संघात संजय बंड यांच्यासह पालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रा. प्रशांत वानखडे, महानगर प्रमुख दिगंबर डहाके, सहसंपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी उमेदवारी मागितली होती. संजय बंड यांना उमेदवारी मिळाल्याने पालिकेतील शिवसेनेचा एक मोठा गट बंड यांच्या प्रचारापासून लांब आहे. धामणगाव रेल्वे मतदार संघातील स्थिती वेगळी नाही, येथून माजी जिल्हा प्रमुख बाळा भागवत यांनी उमेदवारी मागितली होती, मात्र सिद्धेश्वर चव्हाण यांना शिवसेनेने जवळ केले.
दुस-या मतदार संघात प्रचार
शिवसेनेचाप्रचार केला नाही, असा ठपका कोणी ठेवू नये म्हणून काही नेते कार्यकर्ते दुस-या मतदारसंघातील प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. यामध्ये काही तरुण नेत्यांचा समावेश आहे. सर्वच मतदारसंघांत उमेदवार असल्याने स्थानिक उमदेवारीची मते बळकट करण्यापेक्षा अन्य मतदारसंघांत प्रचार करण्यात अनेकजण धन्यता मानत असल्याचे चित्र आहे.