आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • At A Meeting Of The Municipal Police Were Called

मनपाच्या आमसभेत राडा - सर्मथकांना हटवण्यासाठी करावे लागले पोलिसांना पाचारण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती-महापालिकेच्या सोमवारी झालेल्या आमसभेत तीन महत्त्वपूर्ण प्रश्नांवरून चांगलेच रणकंदन माजले. अपात्र नगरसेवक प्रकरणाशी निगडित प्रश्नांचा विषयपत्रिकेत समावेश न करणे, रिलायन्स कंपनीला शहरात खोदकामाची प्रशासनाने दिलेली मंजुरी आणि बसप गटनेतेपदाचा चिघळलेला वाद आदी मुद्दय़ांवरून आमसभेत सदस्यांची आक्रमकता, संताप दिसून आला. सदस्यांकडून फेकण्यात आलेले माइक, टेबल आणि अजय गोंडाणे सर्मथकांनी थेट सभागृहात घुसण्याचा केलेला प्रयत्न; यामुळे महापालिकेचे राजकारण पुरते ढवळून निघाले.

अपात्र नगरसेवकप्रश्नी चर्चा का टाळली? :

महापालिकेच्या 2012 मध्ये झालेल्या निवडणुकीत विहित मुदतीत खर्चाबाबत विवरण सादर न केल्याने निवडणूक आयोगाने अपात्र घोषित केलेल्या सात नगरसेवकांचा प्रश्न सर्व सदस्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. सर्वपक्षीय मुद्दा असल्याने भाजपचे गटनेते संजय अग्रवाल यांनी अपात्र केल्यानंतर सात सदस्यांनी कामकाजात भाग घेतले का याबाबत चर्चा करणे तसेच यामध्ये प्रशासनाची काय भूमिका आहे, हे मुद्दे मांडले. सदस्यांनी सर्वसाधारण सभेत विचारलेल्या प्रश्नांना विषयप्रक्रियेत समाविष्ट करून घेणे किंवा नाकारणे याबाबत कोणते नियम आहेत? महापौर यांना सदस्यांचा प्रश्न घेणे किंवा नाकारणे, याकरिता कोणते नियम आहेत? प्रश्न अथवा प्रस्ताव आमसभेत घेण्याबाबत कोणते नियम आहेत, आदी प्रश्न उपस्थित केले. मात्र, त्यांच्या या प्रश्नांना बगल देण्यात आली. सकाळी 11 वाजता आमसभा सुरू झाल्यानंतर संजय अग्रवाल यांनी याबाबत प्रशासनाला जाब विचारला. प्रश्नांचा विषयपत्रिकेत समावेश न करण्यात आल्याने सर्वच सदस्यांनी संताप व्यक्त केला. सदस्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याऐवजी त्यांना खाली बसण्यास सांगण्यात आल्यामुळे सभागृहाचा रंगच बदलला. चर्चेमध्ये संजय अग्रवाल, प्रा. प्रशांत वानखडे, प्रा. प्रदीप दंदे, गटनेते अविनाश मार्डीकर, अजय सामदेकर, बबलू शेखावत, विलास इंगोले, प्रवीण हरमकर, मिलिंद बांबल आदी सदस्यांनी भाग घेतला.

रिलायन्सच्या खोदकामाला स्थायी समितीची मंजुरी नाही :

रिलायन्स कंपनीकडून शहराच्या विविध भागांत खोदकाम केले जात आहे. मात्र, या कामाला प्रशासनाने परस्पर मंजुरी दिल्याने सदस्यांची या विषयावर आक्रमकता दिसून आली. चार कोटी रुपयांचा निधी घेत महापालिका प्रशासनाने रिलायन्सला खोदकाम करण्यास परवानगी दिली आहे. 50 कोटी रुपये मिळत असताना केवळ चार कोटी रुपयांच्या बदल्यात खोदकामास परवानगी देणे चुकीचे असल्याचे सदस्यांचे म्हणणे होते. स्थायी समितीच्या मंजुरीशिवाय खोदकाम केले जात असल्याबद्दल सदस्यांनी आश्चर्य व्यक्त केले. यावर चर्चा सुरू असताना चेतन पवार यांनी स्थायी समितीची खोदकामास मंजुरी नसल्याची माहिती सभागृहात दिली. दरम्यान, पीठासीन सभापती उपमहापौर नंदकिशोर वर्‍हाडे यांनी सर्वांना खाली बसण्यास सांगितले.

आयुक्त कक्षासमोर ‘ठिय्या’ :

गुंफा मेर्शाम यांना गटनेतेपदी घोषित करण्यासाठी बसप कार्यकर्त्यांनी आयुक्त अरुण डोंगरे यांच्या कक्षासमोर ठिय्या दिला. या वेळी गुंफा मेर्शाम यांच्यासह निर्मला बोरकर, दीपक पाटील, सुदाम बोरकर, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र मुंदे आदी कार्यकर्त्यांनी आयुक्त अरुण डोंगरे यांची भेट घेतली. विभागीय आयुक्त डी. आर. बनसोड यांच्या पत्रानुसार कारवाई करण्याची मागणी या वेळी त्यांनी लावून धरली.

बसप गटनेतेपदाचा रंगला वाद :

बसपचे गटनेते अजय गोंडाणे यांना हटवून त्यांच्या जागी गुंफा मेर्शाम यांच्या नावाची घोषणा करण्याबाबतचा विषय प्रशासनाकडून आला आहे. विभागीय आयुक्तांच्या निर्देशानंतर हा विषय विषयपत्रिकेवर आल्याने चर्चा होणे अपेक्षित होते. चर्चा होऊ नये, असे बसपच्या एका गटाला वाटत होते, तर दुसर्‍या गटाने चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. आमसभा सुरू होताच सदस्य दीपक पाटील, गुंफा मेर्शाम आणि निर्मला बोरकर यांनी पीठासीन सभापतींसमोर जात याबाबत त्यांची भूमिका स्पष्ट केली. सभागृह सुरू होऊन अर्धा तासापर्यंत या तिन्ही विषयांवर गदारोळ होत राहिला. गुंफा मेर्शाम यांच्या सर्मथनार्थ बसपचे झेंडे घेऊन काही कार्यकर्ते आधीच प्रेक्षक गॅलरीमध्ये येऊन बसले होते. सभा सुरू होऊन अर्धा तासाचा कालावधी लोटल्यानंतर म्हणजेच 11.30 वाजता ‘दीपक पाटील मुर्दाबाद’ची नारेबाजी करीत अजय गोंडाणे यांच्या सर्मथकांनी चक्क सभागृहात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तेथे असलेल्या सुरक्षा रक्षकांनी प्रवेश द्वाराजवळ त्यांना मोठय़ा जिकरीने अडवून धरले. त्यामुळे प्रचंड गदारोळ झाला.