आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एटीएम ‘रामभरोसे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती - शहरातील ‘एनी टाइम मनी’ देणारे मशीन असलेल्या एटीएम केंद्रांच्या सुरक्षिततेचाच प्रश्न निर्माण झाला असून, बिनदिक्कतपणे उघड्या असणार्‍या या एटीएम केंद्रांच्या प्रवेशद्वारांचे सारे नियम धाब्यावर बसवले जात आहेत.

एटीएमचे दरवाजे सताड उघडे असतात. त्यांना अधिक सुरक्षा देण्याऐवजी तेथील सुरक्षेच्या उपायांकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. शहराचा मागोवा घेतला असता, तब्बल 95 टक्के एटीएमच्या दरवाजांचे मॅग्नेटिक डोअर सिस्टीम बंद असल्याचे धक्कादायक तथ्य पुढे आले आहे. काही एटीएमना दरवाजे नसल्याचेही दिसून आले.

अमरावती शहरात 26 बँकांचे तब्बल 110 एटीएम आहेत. सर्वाधिक एटीएम पंचवटी चौक ते शेगाव नाका या एक किलोमीटर रस्त्यावर आहेत. त्याव्यतिरिक्त शहराच्या कानाकोपर्‍यात आणि जुन्या नागपूर बायपासवरसुद्धा अनेक एटीएम आहेत. पैसे काढण्यासाठी बँकेत जाणे नागरिकांनी जवळपास बंद केले आहे. कारण 20 हजारांपर्यंतची रक्कम एटीएमवरूनच मिळते. अशा परिस्थितीत एटीएम हेच नागरिकांचे आर्थिक गरज भागवणारे केंद्र ठरले आहे.

एटीएमना कडेकोट सुरक्षा आवश्यक आहे. यासाठी रिझर्व्ह बॅँकेचे काही नियमही आहेत. या नियमावलीकडे दुर्लक्ष केले जात असून, त्यांना प्राथमिक सुरक्षा पुरवणारे मॅग्नेटिक डोअर सिस्टीमच बंद असल्याने चोरट्याला सहज आत प्रवेश घेता येतो. परिणामी एटीएममधून पैसे चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, तगडी सुरक्षा देण्याऐवजी असलेली सुरक्षासुद्धा कमी झाली आहे. एटीएम केंद्र नव्याने सुरू झाल्यानंतर मॅग्नेटिक डोअर सिस्टीम सुरू असते.

मॅग्नेटिक डोअर सिस्टीम कार्यरत असल्यानंतर बनावट कार्ड घेऊन आतमध्ये प्रवेश करणे शक्यच होत नाही. त्यामुळे सुरक्षेसाठी मॅग्नेटिक डोअर सिस्टीम चालू स्थितीत ठेवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. एटीएम केंद्रात मोठय़ा प्रमाणावर रक्कम साठवली जाते यामुळे चोरट्यांचे लक्ष शहरातील एटीएम केंद्रावर असते. मॅग्नेटिक डोअर सिस्टीम कार्यान्वित झाली तर एटीएम केंद्रात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाला आधी कार्ड स्वॅप करावे लागते, मगच त्याला आत प्रवेश मिळतो.