अमरावती- माध्यमिक शिक्षण (दहावी) पूर्ण झाल्यानंतर अमरावतीच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात प्रवेश मिळाला. पॉलिटेक्निकची पदविका संपादन केली. ईलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन इंजिनीअरिंगची विद्यार्थिनी. पण, नशिबात काही तरी वेगळच लिहिलं होतं. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातून सर्वाधिक सुवर्णपदक पटकावणारी अमरावतीची युनिव्हर्सिटी टॉपर कांचन क्षीरसागर आपली शैक्षणिक वाटचाल सांगत होती..
2003 मध्ये पॉलिटेक्निक झाल्यानंतर काही कारणास्तव यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात अँडमिशन घेतली. मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी संपादित केली. पुन्हा शिक्षणाचा ट्रॅक चेंज केला. पोटे कॉलेजमधून बी.एड.चं शिक्षण पूर्ण केलं. वडील रमेशचंद्र क्षीरसागर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातून सेवानिवृत्त झाले होते. आई चारुशीला गृहिणी. आयुष्याचा जोडीदारानेही शिक्षणासाठी पाठिंबा दिला. म्हणून एम.एड.चं शिक्षण तिवसा येथून पूर्ण केलं. मराठीतून एम.ए.करण्याचं ठरवलं. लगेच विद्यापीठाच्या पदव्युत्तर पदवी विभागात प्रवेश घेतला. विभागाचे डॉ. मनोज तायडे, डॉ. मोना चिमोटे, डॉ. हेमंत खडके, डॉ. माधव फुटवाळ, डॉ. कोलते यांनी सतत उत्साह वाढवला. त्यामुळे विद्यापीठातून सहा सुवर्ण, एक रौप्य पदक पटकावता आले.
पीएच.डी. करायचीय
मराठीतून एम.ए केल्यानंतर आता पी.एचडी करण्याचा मानस आहे, असं कांचन सांगते. सध्या ती महिला महाविद्यालयात तासिका तत्वावर शिकवते. हेच काम सध्या तरी सुरू ठेवायचेय, असं तिचं म्हणणं आहे.
पुन्हा नवे वळण
कांचनच्या शैक्षणिक प्रवासाने अलीकडेच आणखी एक नवे वळण घेतले आहे. पॉलिटेक्निक, बी.ए., बी.एड., एम.ए. असा प्रवास करणारी कांचन हल्ली डिप्लोमा इन बिझनेस मॅनेजमेंट करीत आहे अमरावतीच्या के.एल. कॉलेजमधून. शिक्षण कोणत्याही विद्याशाखेचं असो जणू काही कांचनवर सरस्वतीची कृपाच आहे, असं म्हटलं तरी अतिशयोक्ती होणार नाही, असाच तिचा शैक्षणिक प्रवास आहे.