आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाफेडला झटका : मार्केटिंग फेडरेशनचे तीन कर्मचारी कोंडले कार्यालयात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- हमीभावाने खरेदी केलेल्या तूर व हरभर्‍याची थकीत रक्कम शेतकर्‍यांना त्वरीत मिळावी या मागणीसाठी आमदार बच्चू कडू यांनी मंगळवारी (दि. 22) जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या तीन कर्मचार्‍यांना तब्बल चार तास कार्यालयात कोंडून खळबळ उडवून दिली. दरम्यान, या आंदोलनानंतर दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास फेडरेशनने 50 लाख रुपये उपलब्ध करून दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बाजार समित्यांमध्ये शेतमालाची कमी दराने खरेदी होऊन शेतकर्‍यांची लुट होऊ नये म्हणून नाफेडच्यावतीने हमीभावाने तूर व हरभर्‍याची खरेदी करण्यात आली होती. परंतु, अद्यापही तूरीचे 2 कोटी 90 लाख रुपये, हरभर्‍याचे 3 कोटी 40 लाख रुपये, तर 22 लाख रुपये मेळघाटातील आदिवासींच्या भुईमूगाची रक्कम नाफेडकडून अदा करण्यात आली नाही. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकार्‍यांकडून मागील सात-आठ महिन्यांपासून रक्कम मिळवण्यासाठी पाठपुरावा सुरू होता. परंतु मुंबईचे अधिकारीच दाद देत नसल्यामुळे शेतकर्‍यांना पैसे मिळू शकले नाही. दरम्यान, यावर्षी सुरवातीला अतिवृष्टी, त्यानंतर गारपीट व आता पावसाच्या खंडामुळे शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आला होता.

जनप्रतिनिधींनीही वारंवार पाठपुरावा करूनही चुकारे होऊ शकले नव्हते. दरम्यान, शेतकर्‍यांचे पैसे त्वरीत मिळावे यासाठी दुपारी 12 वाजताच्या सुमारास आमदार बच्चू कडू कार्यकर्त्यांसह जिल्हा मार्केटिंग फेडरशेनच्या कार्यालयात आले. जिल्हा मार्केटिंग अधिकारी अशोक देशमुख रजेवर असल्यामुळे कार्यालयात मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. यापैकी रमेश पाटील, राजेंद्र वाघमारे व रामकृष्ण बर्वे या तीन कर्मचार्‍यांना कडू यांनी जिल्हा मार्केटिंग अधिकार्‍यांच्या कक्षात कोंडून 25-30 कार्यकर्त्यांसह ठिय्या मांडला. शेतकर्‍यांची थकीत रक्कम त्वरीत मिळावी अशी मागणी कडू यांनी केली.

शेतकर्‍यांच्या घामाचेही पैसे मिळत नाही याचे दु:ख
शेतकर्‍यांचा माल खरेदीसाठीही आंदोलन व पैसे मिळवण्यासाठीही आंदोलन करावे लागते ही दुर्दैवी बाब आहे. शेतकर्‍यांवर नैसर्गिक संकटांवर संकटे येत आहे. परंतु शेतकर्‍याच्या घामाचे पैसेही शासन देऊ शकत नसल्यामुळे वाईट वाटते. त्याचमुळे आंदोलन करावे लागले. बच्चू कडू, आमदार

आदिवासींचे लाखो रुपये अद्यापही थकित
मागील वर्षी खरीप हंगामात मेळघाटातील आदिवासीच्या भुईमूगाची अचलपूर बाजार समितीत बेभाव खरेदी केली जात होती. त्यावेळी नाफेडने भुईमूगाची खरेदी करण्यासाठीही आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर आता पैसे मिळण्यासाठीही कडू यांना आंदोलन करावे लागले. या आदिवासींचे अद्यापही 22 लाख रुपये नाफेडकडे थकित आहेत.

कर्मचारीही घाबरले
जिल्हा मार्केटिंग अधिकारी रजेवर असल्यामुळे कार्यालयाची सर्व जबाबदारी तीन कर्मचार्‍यांवर येऊन पडली होती. आंदोलन नेमके कोणते वळण घेईल याची शास्वती नसल्यामुळे कर्मचारीही घाबरले होते. तणावाची परिस्थिती असताना मुंबईचे वरिष्ठ अधिकारीही या कर्मचार्‍यांना दाद देत नसल्यामुळे तीनही कर्मचारी संतप्त झाले होते. तिकडे अधिकारी दाद देत नव्हते तर इकडे आंदोलकांचा संयम ढळत असल्यामुळे कर्मचारीही घाबरले होते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कार्यालयात आमदार बच्चू कडू यांनी अचानक ठिय्या मांडला. यानंतर त्यांनी निषेधात्मक आंदोलन करत दुपारचे जेवणही कार्यालयातच घेतले. आमदारांच्या रुद्र अवताराने कर्मचार्‍यांची मोठी तारांबळ उडाली.