आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बागाईतदारांना आर्थिक मदत, वीज बिलात माफी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत सोमवारी पार पडलेल्या टंचाई आढावा बैठकीत तीन प्रस्ताव मंजूर झाले. या प्रस्तावानुसार लवकरच शासनादेश होईल, ही अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली.

अवर्षणाची स्थिती असल्यामुळे शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करावे, पीक विमा योजनेमध्ये जास्तीत जास्त शेतकर्‍यांना सहभागी करून घ्यावे आणि संत्र्याचा मृगबहर येणार नसल्याने बागाईतदारांना हेक्टरी 25 हजार रुपयांची सरसकट मदत दिली जावी, हे ते तीन ठराव आहेत. हे तिन्ही ठराव मंजूर केल्याचा अहवाल लवकरच शासनाकडे पाठवला जाणार असून, त्यादृष्टीने निर्णय व्हावा, असा प्रयत्न केला जाणार आहे.

पाऊस लांबल्याने उद्भवलेल्या अवर्षणाच्या पार्श्वभूमीवर विखे पाटील यांनी सोमवारी (दि. 21) अमरावतीत बैठक घेतली. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या बैठकीला महापौर वंदना कंगाले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सुरेखा ठाकरे व आमदार रवि राणा वगळता इतर सर्व आमदार आणि विभागप्रमुख उपस्थित होते.

पावसाची सद्य:स्थिती बरी असल्याने पश्चिम विदर्भात पिण्याच्या पाण्याचे संकट उद्भवणार नाही; परंतु शेतीपिकाचे मोठे संकट या भागावरही ओढवले आहे. पाऊस लांबल्याने पेरण्या झाल्या नाहीत आणि पेरण्या झाल्या नाहीत म्हणून शेती उत्पादनात मोठी घट येणार, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असे मत अनेकांनी या बैठकीत नोंदवले. त्यांच्याशी सहमती दर्शवत पालकमंत्र्यांनीही हा मुद्दा शासनदरबारी मांडण्याचे व त्यादृष्टीने प्रयत्न करून शेतकर्‍यांसाठी ठोस उपाययोजना करण्याचे मान्य केले. पाणी, चारा व शेतीपिकाच्या टंचाईची स्थिती राज्यात सर्वदूर आहे. त्यामुळे शेतकरीहिताचा शासन निर्णय होईलच, असा आशावादही विखे पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केला.

बैठकीच्या प्रारंभी उपस्थितांनी शेतीसंबंधित अनेक मुद्दे समोर आणले. नापेर क्षेत्र, पीक विमा योजना, शेती उत्पादनाचे संकट, संत्रा बागांच्या अडचणी अशा अनेक समस्या या वेळी मांडण्यात आल्या. बैठकीला आमदार डॉ. अनिल बोंडे, प्रवीण पोटे, बच्चू कडू, प्रा. वीरेंद्र जगताप, अँड. यशोमती ठाकूर, केवलराम काळे, रावसाहेब शेखावत, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, शहराध्यक्ष संजय अकर्ते आदींसह विविध विभागांतील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
आ. बोंडे यांनी मांडल्या व्यथा
बैठकीदरम्यान आमदार डॉ. अनिल बोंडे बरेच आक्रमक होते. शेतीपिकांच्या, बागाईतदारांच्या प्रश्नावर ते संतप्त झाले. पाऊस लांबल्यामुळे मृग बहर येणार नाही आणि आंबिया हातचा गेला, त्यामुळे त्यांना हेक्टरी 50 हजारांची मदत दिली जावी, अशी त्यांची मागणी होती. याशिवाय सर्व शेतकर्‍यांचे वीज बिल माफ करावे, असा मुद्दाही त्यांच्याच संबोधनातून पुढे आला.
आमदार बच्चू कडू यांचा आंदोलनाचा इशारा
अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांनी पणन महासंघाविरुद्ध कोणत्याही क्षणी आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला. तूर, हरभरा आणि भुईमुगाच्या खरेदीची रक्कम वर्षभरापासून न मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ते संतप्त होते. ते म्हणाले, वर्ष लोटले; तरीही शेतकर्‍यांना पैसे मिळाले नाहीत. संबंधित यंत्रणेशी संपर्क करूनही ते प्रतिसाद देत नाहीत, असे लेखी निवेदनच त्यांनी पालकमंत्र्यांच्या पुढय़ात ठेवले.