अमरावती- हैद्राबाद येथे मागील आठवड्यात झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर ‘दिव्य मराठी’ने देशास जोडणार्या बडनेरा या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकाची सुरक्षा, प्रवासी सुविधा, स्वच्छता व पायाभूत सुविधांच्या दृष्टीने आढावा घेतला. कर्मचारी आणि आधुनिक साधनांचा तुटवडा, यासारखे प्रश्न येथे भेडसावत आहे. पश्चिम विदर्भातील या महत्त्वाच्या स्थानकाहून रोज हजारो प्रवासी ये-जा करतात. देशभरातील रेल्वेगाड्या येथून जातात. या पार्श्वभूमीवर या स्थानकाचे नाव देशातील आधुनिक स्थानकांच्या यादित असायला हवे होते. मात्र, राजकीय व प्रशासकीय अनास्थेमुळे हे रेल्वेस्थानक अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले आहे. कचरा, जनावरांची विष्ठा यामुळे माश्या आणि दुर्गंधी पदोपदी जाणवते.
अमरावती रेल्वे स्थानकावरील प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर असताना बडनेरा स्थानकावर प्रवासी बॅग स्कॅनिंग मशीनचे कार्य कर्मचार्यांच्या तुटवड्यामुळे प्रभावित झाले आहे. स्कॅनिंग सुस्थितीत असतानाही कर्मचार्यांच्या अपुर्या संख्येमुळे ही मशीन ‘रामभरोसे’च असल्याचेच दिसून येत आहे. वर्दळीच्या वेळी फलाटावर प्रवेश करणार्या प्रवाशांच्या बॅगची तपासणी होत नाही. याबाबत रेल्वे सुरक्षा दलाच्या अधिकार्यांनी मात्र चुप्पी साधली. आवश्यक असेल त्याच प्रवाशांचे सामान तपासण्यात येते, असे या अधिकार्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, रेल्वे स्थानक व गाड्यांमध्ये होणारे बॉम्बस्फोट रोखण्यासाठी मुख्य स्थानकासह छोट्यामोठय़ा स्थानकांवर प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष काळजी घेण्यात येते. तथापि, चेन्नई रेल्वे स्थानकावर झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्वच प्रमुख रेल्वे स्थानकांवर सुरक्षेबाबत अलर्ट राहण्याचे निर्देश आहेत. बडनेरा रेल्वे स्थानकावरील स्कॅनिंग मशीन चालू स्थितीत आहे. पण, कर्मचार्यांच्या रिक्त पदांमुळे ती कधी सुरू, तर कधी बंद ठेवावी लागते. सध्या बडनेरा रेल्वे पोलिस स्थानकात 53 पदांची मंजुरात आहे. प्रत्यक्षात मात्र सहा कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याचे सूत्रांनी सांगितले. शिवाय स्कॉटिंगसह इतर ठिकाणी कर्मचार्यांची नितांत आवश्यकता असल्याने कार्यरत कर्मचार्यांना वेळप्रसंगी सलग कर्तव्यावर जावे लागते. 100 कर्मचार्यांची आवश्यकता असतानादेखील 53 कर्मचार्यांचीच मंजुरात आहे. त्यातही सहा कर्मचार्यांची पदे रिक्त असल्याने या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले. प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेच संशयित प्रवाशांच्या सामानांची तपासणी करण्यात येते. तीन सत्रांत कर्मचार्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, कर्मचार्यांचा तुटवडा आहे. नया अमरावती स्थानकावरही कर्मचार्यांना 12 तास ड्युटी करावी लागत असल्याचे आरपीएफचे निरीक्षक मनीष नायक यांनी सांगितले.