आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bahujan Samaj Party,latest News In Divya Marathi

बसप'च्या उमेदवारांमुळे बिघडेल अनेकांचे गणित, धामणगाव, अचलपूर,तिवसा मतदारसंघांत चांगला जनाधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- जिल्ह्यात बहुजन समाज पक्षाने आठ ही मतदारसंघांमध्ये उमेदवार मैदानात उतरवले असून, दखल पूर्व उमेदवारामुळे काही मतदार संघात रोचक लढत होणार असल्याचे संकेत आहे. तिवसा, अचलपूर धामणगाव रेल्वे मतदारसंघांत प्रस्थापित उमेदवारांचे राजकीय भवितव्याचे गणितदेखील बिघडणार आहे.

बसपने बडनेरा मतदार संघातून रवींद्र वैद्य, अचलपूरमधून मो. रफीक सेठ, धामणगाव रेल्वेतून अभिजीत ढेपे, अमरावतीतून मिर्झा नईम बेग नाजीर बेग, तिवसामधन संजय लव्हाळे, मेळघाटमधून किसन जामकर, मोर्शीतून मृदुला पाटील, दर्यापूरमधून एजाज मोहम्मद शेख महम्मद यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे. तीन मतदार संघात बसपने मुस्लिम उमेदवाराला संधी दिली असून तिनही उमेदवार त्यांच्या मतदार संघात मातब्बर आहे.
या शिवाय धामणगाव रेल्वे तिवसा मतदार संघात देखील जातीय समीकरणाचा विचार करीत उमेदवारी देण्यात आली. तिवसा मतदार संघात संजय लव्हाळे यांना त्यांच्या समाजाचे भक्कम पाठबळ मिळणार असल्याचे संकेत आहे. मात्र येथे विद्यमान आमदार अॅड. यशोमती ठाकूर, भाजपच्या निवेदिता चौधरी, शिवसेनेचे दिनेश वानखडे, राष्ट्रवादीचे साहेबराव तट्टे तर प्रहारच्या संयोगिता निंबाळकर रिंगणात आहे. लव्हाळे यांच्यामुळे कोणाचे गणित बिघडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. धामणगाव मधून आमदार प्रा. वीरेंद्र जगताप विजयाची हॅटट्रीक मारण्याच्या तयारीत आहेत. मात्र भाजपचे परंपरागत प्रतिद्वंदी अरुण अडसड, शिवसेनेचे सिद्धेश्वर चव्हाण, बसपचे अभिजित ढेपे यांचे आव्हान राहणार आहे. हा मतदारसंघ तीन तालुक्यांमध्ये विखुरल्या गेल्याने कोण कुठे मार खाईल याचा नेम नाही. जातीय समीकरण लक्षात घेता ढेपे यांच्यामुळे निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे. मोर्शीतून भाजपच्या महिला आघाडीच्या नेत्या मृदुला पाटील यांना बसपने उमेदवारी दिली आहे. विद्यमान आमदार डॉ. अनिल बोंडे यांना भाजपने उमेदवारी दिल्याने येथे नवीन समिकरण निर्माण झाले असून त्यांच्या मतांना मृदुला पाटील किती खिंडार पाडणार हे महत्वपूर्ण ठरणारे आहे. बडनेरामधून काँग्रेसच्या सुलभा खोडके, विद्यमान आमदार रवी राणा, शिवसेनेचे संजय बंड तर बसपने रवींद्र वैद्य यांना निवडणूक रिंगणात उतरविल्याने कोणाची मते कमी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अमरावती, अचलपूर आिण दर्यापूरमधील लढतही चुरशीची होण्याचे संकेत आहेत.