आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडाळीत बांबू पर्यटन केंद्र, अनेक दुर्मिळ प्रजातींचे बांबू उपलब्‍ध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - शहरातील वडाळी परिसरात वनविभागाची वडाळी रोपवाटीका आहे. या रोपवाटीकेमध्ये मागील २० ते २५ वर्षांपासून देशातील तसेच विदेशातील बांबूच्या जाती आणून त्याचे संवर्धन करण्यात आले.

या ठिकाणी सध्या अनेक दुर्मिळ प्रजातींचे बांबू मोठ्या प्रमाणात आहेत. आपल्या भागात आढळणाऱ्या मोजक्या दोन ते तीन प्रजातींपेक्षा बांबूच्या अधिक जाती वडाळीतील बांबू पर्यटन केंद्रात आता पाहायला मिळणार आहेत. बांबू पर्यटन केन्द्र रोपवाटीकेच्याच जागेवर उभारणीचे काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, आहे त्याच साधनांमध्ये कमीत कमी खर्च करून हा प्रकल्प साकारण्यासाठी वनविभागाचे स्थानिक अधिकारी प्रयत्न करत आहेत.
बांबूच्या वेगवेगळ्या प्रजाती वनविभागाच्या वडाळी रोपवाटिकेत आहेत. मागील २० वर्षांपासून त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. बांबूच्या या प्रजाती, त्यांचे महत्त्व, उपयोग याची माहिती व्हावी; पर्यावरणाचा समतोल राखला जावा, यासाठी वडाळी रोपवाटिकेमध्ये तब्बल शंभर एकरांत बांबू पर्यटन केेंद्र उभे होत असून, चार महिन्यांत ते पर्यटकांसाठी खुले होण्याची शक्यता आहे.

आठलाखांचा निधी प्राप्त : यामहत्वाकांक्षी पर्यटन विकासाला पुरक प्रकल्पासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी लाख रुपये निधी चार ते पाच महिन्यापूर्वी दिला आहे. या निधीमधून कामाला सुरूवात झालेली आहे. पर्यटन केन्द्रांमध्ये बांबू तयार होणाऱ्या वस्तूसाठी सध्या दररोज कुशल कामगार (बांबूकला) कार्यरत असून याव्यतिरिक्त ४० ते ५० मजूर काम करत आहे.

पर्यटनकेंद्राची सध्या स्थिती : पर्यटनकेंद्रात सध्या बांबूचे विविध प्रकार उपलब्ध आहेत. कोणता बांबू कोणत्या जातीचे आहे, त्याचे वैशिष्ट्य काय, उपयोग काय, कोणत्या भागातील, राज्यातील, देशातील आहे, हे दाखवणारे फलक तयार करण्याचे काम सुरू आहे.

काय असेल या बांबूच्या केंद्रात ?
बांबूपर्यटन केंद्रात वडाळी रोपवाटिकेमध्ये असलेल्या तब्बल ६२ प्रजातींचे बांबू पहायला मिळतील. प्रत्यक्षात याठिकाणी ८० जातीचे बांबू आहेत. पर्यटन केंद्र असल्यामुळे या ठिकाणी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना बसण्याची, जेवण करण्याची; तसेच लहान मुलांना खेळण्यासाठी विविध खेळणे, झोपडीसुद्धा तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. विशेष म्हणजे या पर्यटन केंद्रात तयार होणारी प्रत्येक वस्तू उपकरण ही बांबूपासून तयार केलेलीच राहणार आहे. बांबूपासून झुला, घसरगुंडी, पॅगोडा तयार करण्याचे काम सुरू आहे. इतकेच नाही, तर पर्यटन केंद्रात पथदिव्यांसाठी लागणारे खांब हे लोखंडी किंवा सिमेंटचे राहता ते बांबूचेच राहणार आहे. एकंदरीत कमी खर्चात, नैसर्गिक उपलब्धतेवर आधारित हा प्रकल्प उभा करण्याचा मानस वनविभागाच्या अधिकाऱ्यांचा आहे.

एकाच ठिकाणी ६२ प्रजाती
-मागील२५ वर्षांपासून मी बांबूचा अभ्यास करत असून, त्यानिमित्त देशासह विदेशात जाऊन आलोत. एकाही ठिकाणी एकाच जागी बांबूच्या ६२ प्रजाती नाहीत. त्या वडाळीत आहेत. सै.सलीम अहमद, वनपाल तथा बांबू अभ्यासक, वडाळी
* १०० फूट उंच आणि १०० किलो वजनाचा बांबू
* या पर्यटन केंद्रात कधी पाहिलेले ऐकलेले बांबू आहेत.
* डेन्ड्रोकॅलामस ब्रान्डीसि शंभर फुटांपेक्षा उंच वाढतो
* बांबूसा बालकोआ (भीमा बांबू) एकाच बांबूचे वजन शंभर किलो.
* डेन्ड्रोकॅलामस जीजॅन्टस (महाबांबू) एक फुटाचा व्यास
* बांबूसा बाम्बूस (काटेरी बांबू) काटे आहेत.
* डीन्चोला अॅन्डामानिया (वेली बांबू) वेलासारखा वाढतो.
* थ्रायसोस्टॅस ओलिव्हरी विनाफांदीचा बांबू.
* डेन्ड्रोकॅलामस अॅस्पर खाण्यासाठी वापर (चीन).
* या प्रमुख बांबू प्रजातींसह अनेक बांबूंच्या आपल्याला वडाळी वन विभागाच्या या बागेत पहायला मिळतात. नवे केंद्र सुरू झाल्यास पर्यटनाला वाव मिळेल.

लवकरच पर्यटकांच्या सेवेत
-बांबूपर्यटन केंद्राचे गतीने काम सुरू आहे. अंतर्गत रस्ते झाले, बांबूपासून तयार होणाऱ्या बहुतांश वस्तू यामध्ये राहणार आहेत. चार महिन्यांत हे केंद्र सुरू करण्याचा प्रयत्न. प्रदीपलकडे, वनपरिक्षेत्र अधिकारी, वडाळी