आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अस्वलाचा धुमाकूळ , पोलिस मजा पाहण्यातच दंग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा - अचलपूर शहरालगत एका केळीच्या शेतात मंगळवारी सकाळी सहा वाजता मादी अस्वल आढळून आले. ही वार्ता शहरात पसरताच लोकांची शेतात एकच गर्दी झाली. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना पाचारण करण्यात आले. दुसरीकडे वनविभागाच्या पथकाने दिवसभर घाम गाळूनही हे अस्वल त्यांच्या जाळ्यात आले नाही. दरम्यान, चवताळलेल्या अस्वलाने दोन शेतकर्‍यांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. एरवी मेळघाटच्या जंगलात आढळणार्‍या अस्वलाने प्रथमच जुळय़ा शहरांलगत धुमाकूळ घातल्याने शहरात दिवसभर हीच चर्चा सुरू होती.

अचलपूर शहरातील महेराबपुरा परिसराला लागून असलेल्या शहापूर शिवारात प्रदीप पाटील यांचे शेत आहे. त्यांच्या शेतात केळीची बाग आहे. या मार्गाने शेताकडे निघालेले राजू गभने यांचे केळीच्या बागेतील या काळसर प्राण्याकडे लक्ष गेले. प्रथम त्यांनी ते डुक्कर असल्याचा समज करून घेत हाकलण्याचा प्रयत्न केला. तथापि, ते अस्वल असल्याचे लक्षात येताच त्यांनी काढता पाय घेतला. राजू गभने यांनी भेदरलेल्या अवस्थेत ही माहिती प्रदीप पाटील यांना कळवली. पाटील यांनी सरमसपुरा पोलिस ठाण्याला फोन करून सूचित केले. तोपर्यंत अस्वलाची बातमी संपूर्ण शहरात पसरली. उत्सुकतेपोटी लोक पाटील यांच्या शेताकडे पळत सुटले. त्यांना पांगवण्यासाठी पोलिस तर अस्वलाला पकडण्याकरिता वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना झाले. सकाळी सहापासून अस्वलाचा पाठलाग सुरू झाला. ते कधी केळीच्या बनात, कधी मक्याच्या शेतात, तर कधी काटेरी झुडुपात लपत होते. त्याला पकडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी हरिश्चंद्र पडगव्हाणकर, वनपाल अशोक आठवले, दिनेश वाट यांच्यासह सहकारी दिवसभर पाठलाग करीत होते. अमरावतीवरून विशेष पथकालाही पाचारण करण्यात आले. अस्वल गरोदर असल्याने पकडण्यासाठी प्रतिबंधात्मक इंजेक्शनचा वापर पथकाला करता आला नाही. सायंकाळी अंधार पडल्यावर रात्रीपुरती मोहीम थांबवण्यात आली.
पोलिस मजा पाहण्यातच दंग
जमलेल्या व परिसरात काम करणार्‍या लोकांना गाडीवरचे सायरन वाजवून व भोंग्यावरून संदेश देऊन सतर्क करण्याऐवजी पोलिसही अस्वलाला पकडण्याची मजा पाहण्यातच दंग झाले होते. शेतात अस्वल असल्याची माहिती इतर शेतकर्‍यांना दिली नाही तसेच बघ्यांची गर्दीसुद्धा कमी केली नाही.