आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदत संपण्यापूर्वीच औषधी फेकली दरीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परतवाडा- लाखो रुपयांचा वैधता असलेला औषधीसाठा नाहीसा करण्याच्या उद्देशाने दरीत फेकून दिला गेल्याचे बुधवारी उघडकीस आले. धामणगावगढीपासून अवघ्या दोन किमी अंतरावरील चिखलदरा मार्गावर डाव्या बाजूला दरीत हा औषधीसाठा आढळून आला आहे.
लाखो रुपयांच्या इंजेक्शनची औषधी आणि टॅबलेटचा यात समावेश आहे. आढळून आलेल्या या औषधींची एक्सापायरी डेट २०१६-१७ ची असूनही उपयोगात येणारी ही औषधी कुणी का फेकून दिली असावी, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. मेळघाटातील आरोग्य सेवा नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. महाराष्ट्र शासन मेळघाटातील आरोग्य व्यवस्थेसाठी करोडो रुपयाची तरतूद आर्थिक बजेटमध्ये करत असते.
शासनाचे आरोग्य सेवेवर विशेष लक्ष असताना एकीकडे वैधता असलेली औषधी फेकून दिल्या जाते. ही बाब गंभीर असून, त्याची चौकशी होणे आवश्यक आहे. लाखो रुपयांचे मूल्य असणारी ही औषधी मेळघाटातील प्राथमिक केंद्रातीलच असल्याची शक्यता नागरिकांकडून वर्तवण्यात येत आहे. या औषधीवरील लॉट क्रमांक इतर माहिती घेऊन संबंधित दोषींवर कारवाई करणे आवश्यक आहे. ही बाब गंभीर असून, मोठ्या प्रमाणात हा औषधीसाठा धामणगावगढीपासून अवघ्या दोन किमीच्या अंतरावरील दरीत बेवारसपणे पडून आहे.
दोषींवर कारवाई करण्यात येईल
- दरीत फेकून देण्यात आलेल्या औषधीसाठ्याबाबत जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना चौकशी करण्याचे निर्देश देण्यात येईल. चौकशी केल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल.
डॉ. अविनाश लव्हाळे, उपसंचालक, आरोग्य विभाग, अकोला.
औषधी फेकून देणे ही बाब गंभीरच आहे
- धामणगाव गढीपासून अवघ्या काही अंतरावर हा औषधीसाठा आढळून आला. ही बाब गंभीर आहे. एकीकडे शासकीय रुग्णालयांकडून रुग्णांना औषधी असूनही बाहेरून औषधी आणण्याचे सांगण्यात येते. ही बाब गंभीर आहे.
प्रकाश गिऱ्हे, धामणगाव गढी.